एकाच औषधाचा करताय शेतात अति वापर, वेळीच करा बदल, नाहीतर होतील हे परिणाम
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एकाच औषधाचा वारंवार वापर ही सध्या शेतीसमोरील गंभीर आणि दुर्लक्षित समस्या बनत चालली आहे. अनेक शेतकरी किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सतत तेच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतात.
बीड : एकाच औषधाचा वारंवार वापर ही सध्या शेतीसमोरील गंभीर आणि दुर्लक्षित समस्या बनत चालली आहे. अनेक शेतकरी किडी आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सतत तेच कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरतात. सुरुवातीला याचा परिणाम दिसून येतो. मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागतात. यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर संपूर्ण शेती परिसंस्थेचे मोठे नुकसान होते आणि दीर्घकालीन उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, अशी माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.
कृषी अभ्यासकांच्या मते, एकाच औषधाचा सातत्याने वापर केल्यामुळे किडी आणि रोगांमध्ये प्रतिकारशक्ती (रेझिस्टन्स) निर्माण होते. यामुळे आधी प्रभावी ठरणारे औषध हळूहळू निष्प्रभ ठरते. परिणामी किडी अधिक बळकट होतात आणि नियंत्रण करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना औषधांचा डोस वाढवावा लागतो किंवा अधिक महागडी आणि तीव्र रसायने वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा थेट परिणाम उत्पादन खर्च वाढीवर होतो आणि नफा कमी होतो.
advertisement
याशिवाय रासायनिक औषधांच्या अति आणि चुकीच्या वापराचा परिणाम उपयुक्त कीटकांवरही होतो. परागीभवन करणाऱ्या मधमाश्या, भुंगे तसेच मित्र कीटक नष्ट झाल्यास फळधारणा प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे उत्पादन घटते आणि पिकांची गुणवत्ता देखील कमी होते. जमिनीत आणि पाण्यात औषधांचे अवशेष साचल्याने मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, ज्याचा परिणाम जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेवर होतो. दीर्घकाळात जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण होतो.
advertisement
या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला कृषी विभाग आणि तज्ज्ञ देत आहेत. वेगवेगळ्या घटक गटातील औषधांचा आलटून-पालटून वापर केल्यास किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. तसेच गरज नसताना फवारणी टाळून आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊनच औषधांचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे रासायनिक औषधांचा अनावश्यक वापर टाळता येतो.
advertisement
जैविक कीटकनाशके, फेरोमोन सापळे, मित्र कीटकांचे संवर्धन, पीक फेरपालट आणि योग्य कृषी पद्धतींचा अवलंब केल्यास शेती अधिक शाश्वत बनू शकते. योग्य डोस, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने फवारणी केल्यास पिकांचे संरक्षण प्रभावीपणे होते आणि पर्यावरणाचेही रक्षण होते. एकाच औषधावर अवलंबून न राहता संतुलित आणि शास्त्रशुद्ध कीड व्यवस्थापन केल्यास उत्पादन सुरक्षित राहून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल, असा तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 3:55 PM IST






