हळदीला चांगला रंग कसा आणायचा, बुरशी येऊ नये म्हणून काय करायचं? कृषी तज्ज्ञांनी सांगितलं खास सीक्रेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
चांगल्या बाजारभावासाठी हळद शिजवताना योग्य ती काळजी घेणे फायदेशीर ठरते. काढणी केल्यानंतर हळदीवर काही प्रक्रिया केल्या जातात.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: चांगल्या बाजारभावासाठी हळद शिजवताना योग्य ती काळजी घेणे फायदेशीर ठरते. काढणी केल्यानंतर हळदीवर काही प्रक्रिया केल्या जातात. यापैकीच अत्यंत महत्त्वाच्या आणि बाजारभावावर परिणाम करणाऱ्या हळद शिजवण्याच्या सुधारित पद्धती विषयी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेऊया.
हळद हे महाराष्ट्रातील मसाला पिकात एक प्रमुख नगदी पीक आहे. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधे, सौंदर्य प्रसाधने, जैविक कीटकनाशके इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतो. हळदीची काढणी केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. प्रक्रियेमध्ये हळद शिजवणे, वाळवणे, पॉलिश करणे आणि प्रतवारी करणे या बाबी समाविष्ट असतात.
advertisement
चांगल्या बाजारभावासाठी तयार हळकुंडांची गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी. शास्त्रोक्त पद्धतीने हळद काढणी केल्यानंतर प्रक्रिया करून बाजारात पाठवावी. कच्च्या हळदीस कमी बाजारभाव मिळतो. हळद काढणीनंतर त्वरित सावलीत किंवा पाल्याखाली साठवण करावी. त्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्येच हळदीवर शिजविण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सर्व हळकुंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ तर लहान हळकुंडांना कमी वेळ लागतो. त्यामुळे हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून घ्यावी.
advertisement
हळद शिजवण्याचे फायदे :
1. बुरशी आणि इतर जिवाणू यांचा नाश होऊन हळकुंड रोगमुक्त राहते.
2. हळकुंडांवरील धागे आणि इतर दुर्गंधी येणारे घटक निघून जातात.
3. हळदीतील कुरकुमीनचे प्रमाण योग्य रखले जाते.
4. वाळण्याची प्रक्रिया जलद होते.
हळद वाळविणे :
1. शिजवलेली हळद 12 ते 15 दिवस उन्हात चांगली वाळवावी. पहिले चार दिवस दोन इंचापेक्षा जाड थर देऊ नये. ओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू नये.
advertisement
2. लोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद 20 ते 30 मिनिटांसाठी पसरविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. गरम हळकुंड हलविल्यास तुटतात. हळकुंडाची तूट टाळण्यासाठी
थंड होईपर्यंत हात लावू नये.
3. हळद वाळत घालताना शेडनेट किंवा साड्यांवर वाळवावी.
4. काळ्या मातीत जमीन सपाट करून पसरू नये. कारण, मातीचा ओल्या हळदीशी संपर्क येतो. शिवाय मालाची प्रत खराब होते.
advertisement
5. हळद वाळत घातल्यानंतर आवश्यकतेनुसार 1ते 2 वेळा हलवून घ्यावी. माती, काडीकचरा, जेठेगड्डे, बगलगड्डे वेळोवेळी वेगळे करावे.
6. शिजवलेली हळद 8 ते 10 दिवस उन्हात चांगली वाळविल्यानंतर पुन्हा पाणी किंवा पावसाने भिजणार नाही याची काळजी घ्यावी.
8. पूर्ण वाळलेली आणि अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळू नये. अधूनमधून हात देताना कमी शिजलेली, जादा फुगीर हळकुंडे त्वरित वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमान 4 वेळा जास्त ऊन द्यावे. वाळवलेल्या हळकुंडामध्ये आर्द्रतेचे प्रमाण 11 ते 12 टक्के एवढे असावे.
advertisement
हळद शिजवण्याची पद्धत अशी
वाफेच्या साह्याने संयंत्राद्वारे हळद शिजविली जाते. या यंत्राला बॉयलर असे म्हणतात. संयंत्रामध्ये चारी बाजूंना साधारणपणे 250 किलो हळद सामावली जाईल एवढ्या क्षमतेचे चार लोखंडी ड्रम असतात. संयंत्राच्या मध्यभागी पाण्यासाठी दोन टाक्या असतात. पाणी उकळण्यास दीड तासाचा अवधी पुरेसा होतो. पाणी उकळल्यानंतर तयार झालेली वाफ पाइपद्वारे लोखंडी ड्रममध्ये सोडली जाते. हळद शिजल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालील बाजूने असलेल्या नळातून पाणी ठिबकण्यास सुरुवात होते. पाणी येऊ लागताच हळद शिजली आहे असे समजले जाते. किंवा शिजलेले हळकुंड मध्यभागी हलकेच मोडले असता बारीक तारा दिसतात.
advertisement
असे होतत फायदे
ड्रममधील संपूर्ण हळद योग्यरीत्या शिजते. हळदीचा दर्जा राखला जातो. कुरकुमीनचे प्रमाण हळदीत आहे तसे साठविले जाते. एका बॅचमध्ये साधारणपणे 200 किलो कंद आणि दररोज 8 तासांत 40 क्विंटल हळद कंद उकळता येतात. हळद कंदाची 200 किलोची एक बॅच उकळण्यासाठी सुमारे 25 ते 30 किलो सरपणाची आवश्यकता असते. फक्त तीन माणसे एका दिवसात 40 क्विंटल हळद कंद शिजवू शकतात. गरजेनुसार या सयंत्राची आकारमान वाढविता किंवा कमी करता येते. केवळ वाफेवर उकळल्यामुळे कंद कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळतात. या पद्धतीत सलग उकळण्यामुळे इंधन आणि वेळ कमी लागतो, असं कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील सांगतात.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
March 17, 2025 8:29 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
हळदीला चांगला रंग कसा आणायचा, बुरशी येऊ नये म्हणून काय करायचं? कृषी तज्ज्ञांनी सांगितलं खास सीक्रेट