4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर का आली अशी वेळ?
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
Agriculture news: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते. धाराशिव जिल्ह्यात तर सोयाबीन हे मुख्य पीक. सध्या इथं सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : यंदा मान्सूननं वेळेत हजेरी लावली, त्यामुळे बळीराजा सुखावला. परंतु पावसानं शेतकऱ्यांचंच प्रचंड नुकसान केलं. मराठवाडा आणि विदर्भात कोसळलेल्या जोरदार पावसात लाखो हेक्टरवरील पीक सडून गेलं. तर परतीच्या पावसामुळे अनेक फळांवर, पिकांवर कीड बसू लागलीये. त्यात पिकांमध्ये ओलावा राहतोय तो वेगळाच. याचा दुप्पट फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतोय.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते. धाराशिव जिल्ह्यात तर सोयाबीन हे मुख्य पीक. सध्या इथं सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असून हे पीक म्हणजे 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असं म्हणण्याची वेळ आलीये.
advertisement
1 एकर सोयाबीनसाठी नांगरणीपासून भरडणीपर्यंतचा खर्च अंदाजे 25 हजार रुपये एवढा येतो. तर, यातून उत्पन्न मिळतं 8 क्विंटलच्या जवळपास. सोयाबीनला मिळणारा भाव हा वातावरणावर अवलंबून असतो. साधारण 4000, 4200 किंवा 4400 इतका सोयबीनला भाव मिळतो. परंतु सध्या पावसामुळे हे पीक बरंच ओलं असल्यानं बाजारभाव कमी मिळतोय. त्यामुळे खर्च प्रचंड आणि किंमत कवडीमोल अशी अवस्था सध्या आहे.
advertisement
उत्तम पिक यावं यासाठी पदरमोड करावी लागते, परंतु भाव पडले तर मात्र शेतकऱ्यांचा संसारही कोलमडतो. त्यात सोयाबीन पिक फार नाजूक असतं, ते रोगराईपासून अतिशय जपून वाढवावं लागतं. त्यामुळे 'सोयाबीनला किमान आधारभूत किंमतीनुसार बाजारभाव मिळावा, तरच शेतकऱ्यांना 4 पैसे शिल्लक राहतील', असं मत सोयाबीन उत्पादक शेतकरी संदिपान कोकाटे यांनी मांडलं. तसंच सोयाबीनला लवकरच योग्य भाव मिळेल अशा आशेवर सध्या शेतकरी आहेत.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 19, 2024 1:37 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर का आली अशी वेळ?