अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येवती हे गाव आहे. या गावातील लक्ष्मी गजानन सोनबावणे ही 20 वर्षीय तरुणी गेले 3 वर्षापासून विविध शंकरपटामध्ये सहभागी होत आहे. कृषक सुधार मंडळ तळेगाव यांच्याकडून विदर्भ केसरी जंगी शंकरपट तळेगाव दशासर येथे आयोजित केला जातो. या ठिकाणी महिलांसाठी शेवटच्या दिवशी विशेष शंकरपट दरवर्षी आयोजित केला जातो. या शंकर पटातील 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षाचे पहिले बक्षीस येवती मधील लक्ष्मीला मिळाले आहे.
advertisement
लक्ष्मी ही येवती गावातील सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आईवडील शेती करतात. प्रिया आणि लक्ष्मी या दोघी बहिणी आहेत. लक्ष्मीसोबत लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा तिने सांगितले की, तळेगाव दशासर येथे मी महिलांचा शंकरपट बघायला गेली होती. तेव्हा तेथील महिलांना बघून माझी इच्छा शंकर पटामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली. घरी येऊन बाबाला विचारले. पण, ते नाही म्हणत होते. कारण त्यात खूप भीती असते. बाबा म्हणायचे, बेटा, शंकरपट वगैरे आपल्या सारख्याचे काम नाही. तरी पण बाबाच्या मागेच होते.
वय वर्षे 22, महिन्याची कमाई फक्त 8 लाख, IT मध्ये नोकरी नाही तर पठ्ठ्याचा 200 म्हशींचा गोठा!
तेवढ्यातच गावा शेजारी शंकरपट होता. गावातील काही मित्र आणि मी तो बघायला गेलो. तेथील उत्साह बघून मला राहवत नव्हते. तेव्हा सुद्धा मी बाबांनी नाही म्हटल्यावर सुद्धा शंकरपटात सहभाग घेतला. त्यानंतर तेथील लोकांनी बाबांशी संपर्क केला. त्यांना समजावून सांगितले. तेव्हापासून अनेक ठिकाणी मी पट हाकला. त्यानंतर 2024 मधील शंकर पटात बाबा माझ्यासोबत आले. तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि भीतीदायक होता. कारण मला तिथे देण्यात आलेली शेरा आणि शंभूची जोडी खूप धिप्पाड होती. तरीही सगळ्यांच्या प्रोत्सहनामुळे मी ती स्पर्धा 11. 46 सेकांदामध्ये जिंकली. तेव्हा बाबाच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.
त्यानंतर सुद्धा अनेक स्पर्धा केल्यात. यावर्षी सुद्धा तळेगाव दशासर येथील स्पर्धेत माझाच पहिला नंबर आलाय. यावेळी माझ्यासोबतीला राम आणि सुलतान होते. त्यांच्यासह 2025 मधील शंकरपट सुद्धा 11.96 सेकंदात आम्ही गाजवला, असे लक्ष्मी सांगते.
लक्ष्मीच्या वडिलांना सुद्धा आता तिचा खूप अभिमान आहे. शंकरपटच नाही तर शेतीच्या कामात सुद्धा लक्ष्मी वडिलांना मदत करते. मुलगा नाही पण माझ्या मुली मुलापेक्षा कमी नाही, असे लक्ष्मीचे वडील सांगतात.





