मुंबई : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा उकाडा अद्याप कायम असून, दिवसभर चटके देणारे ऊन आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण अशा मिश्र हवामानाचा अनुभव नागरिकांना येत आहे. हवामान विभागाने आज मंगळवारी (२१ ऑक्टोबर) राज्यातील काही भागांसाठी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात उष्णता कायम राहणार आहे.
advertisement
सध्या राज्यात दिवसाढवळ्या तापमानात वाढ झाल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास वाढला आहे. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थोडासा गारवा अशा विरोधाभासी हवामानामुळे नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, सोमवार (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे तापमान ३५.८ अंश सेल्सिअस, डहाणू आणि ब्रह्मपुरी येथे ३५ अंशांपेक्षा जास्त, तर सोलापूर, रत्नागिरी, अमरावती, अकोला, जळगाव आणि चंद्रपूर येथे ३४ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उर्वरित राज्यात ढगाळ आकाश आणि कोरडे हवामान राहणार असून, दिवसाच्या वेळी उन्हाचा चटका कायम राहील. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना हवामानातील या बदलांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आग्नेय अरबी समुद्रात, लक्षद्वीप आणि केरळ-दक्षिण कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते वायव्य दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसत असून, त्याच्या परिणामस्वरूप आज (ता. २१) आग्नेय बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणालींमुळे हवामानात अस्थिरता निर्माण होऊन, पुढील काही दिवस पावसाची शक्यता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
सध्या केरळ किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याचे हवामान खात्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे दक्षिण-पश्चिम दिशेच्या वाऱ्यांना वेग येत असून, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता पुढील दोन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.