मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने अधिकृतरीत्या माघार घेतल्यानंतर दिलासा मिळाला असला, तरी आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, विशेषत: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेती, जनावरे आणि घरांचे नुकसान झाले होते. शेतकरी नुकतेच या परिस्थितीतून सावरत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२१ ऑक्टोबर : कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा व विदर्भात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
२२ ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा.
२३ ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
२४ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.
२५ ऑक्टोबर: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
या काळात राज्यातील अनेक भागांत सोयाबीन, मका आणि कापसाची काढणी सुरू आहे. त्यामुळे हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी खालील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे: जर हवामान खात्याने आपल्या भागात पावसाचा इशारा दिला असेल, तर शक्य असल्यास सोयाबीन, मका किंवा कापसाची काढणी काही दिवस पुढे ढकला. तसेच काढलेले उत्पादन खुले मैदानात ठेवू नये. ते प्लास्टिकच्या आच्छादनाखाली किंवा शेडमध्ये साठवावे.
पावसामुळे ओलावा वाढतो, त्यामुळे बियाणे, धान्य व कापसाचे ढीग हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी ठेवावेत. ड्रिप व स्प्रिंकलर बंद ठेवावेत पाऊस अपेक्षित असल्यास सिंचन थांबवावे, अन्यथा पिकांना जास्त ओलावा नुकसानकारक ठरू शकतो.