राज्यातील पावसाची स्थिती
रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीतील सावर्डे येथे सर्वाधिक १०० मिमी, रत्नागिरी येथे ८० मिमी, संगमेश्वर आणि चिपळूण येथे प्रत्येकी ६० मिमी, सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे ७० मिमी, जळगावच्या दहिगाव येथे ९० मिमी आणि पाचोरा येथे ६० मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता.
advertisement
तापमानात वाढ
पावसाची उघडीप झालेल्या भागांत कमाल तापमान पुन्हा वाढू लागले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. अमरावती येथे ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर महाबळेश्वर येथे १६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
आज (ता. ३) सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतही विजांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सल्ला
या हवामानातील बदलांचा रब्बी पिकांच्या लागवडीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घ्यावी. जसे की,
लागवडीपूर्वी बियाण्यावर ट्रायकोडर्मा किंवा थायरम सारख्या बुरशीनाशकांची प्रक्रिया करा. पाऊसानंतर लगेच पेरणी न करता, माती थोडी ओलसर पण कोरडी झाल्यावरच लागवड करा. शेतीच्या आजूबाजूला निचरा व्यवस्था ठेवा, जेणेकरून पाणी साचणार नाही. गोमूत्र, शेणखत आणि निंबोळी पेंड वापरून जमिनीची सुपीकता वाढवा.
पेरणीनंतर १५ दिवसांनी तणनाशक फवारणी करा, ज्यामुळे पिकांची वाढ सशक्त राहते. हवामानातील बदलांमुळे अळी, करपा आणि सड रोग वाढू शकतात. त्यामुळे योग्य औषधे आधीपासून उपलब्ध ठेवा.
