राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि पश्चिम बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात आकाश ढगाळ राहणार आहे. काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारख्या सरी पडण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी, जळगाव आणि भंडारा जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढलेले पिके पावसामुळे भिजून शेतात पाण्याखाली गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
advertisement
विदर्भात यलो अलर्ट
हवामान विभागाने विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे होण्याची शक्यता वर्तवली आहे.
तर अकोला, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस होईल, असे अंदाज हवामान खात्याने व्यक्त केले आहेत. पुढील ४८ तास हवामानातील बदलांसाठी निर्णायक ठरणार असून, शेतकऱ्यांनी शेतीतील कामांबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोंथाचा परिणाम
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलेले मोंथा चक्रीवादळ आता कमजोर झाले असून ते डीप डिप्रेशनमध्ये परिवर्तित झाले आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचे चक्र कायम आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे.
हवामान विभागानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता असून, १ नोव्हेंबरपासून पावसाचा जोर कमी होईल. त्यानंतर काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खालील काळजी घेणे गरजेचे आहे. फवारणी करताना पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतरच फवारणी करावी. ओल्या पिकांवर औषध फवारल्यास त्याचा परिणाम कमी होतो. वादळी वारे किंवा विजांच्या परिस्थितीत फवारणी टाळावी. अशा वेळी शेतात जाणे धोकादायक ठरू शकते. कीडनाशके आणि बुरशीनाशके योग्य प्रमाणात मिसळून वापरावीत. जास्त औषधामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. फवारणी करताना प्लास्टिकचा रेनकोट, मास्क आणि हातमोजे वापरावेत. यामुळे रसायनांचा शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही.
