सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे धोक्याचे ४८ तास
सध्या पश्चिम आणि उत्तर भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील २४ ते ४८ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पाच सायक्लोनिक सर्क्युलेशन प्रणाली तयार झाल्या आहेत.त्यापैकी दोन पश्चिम बंगालच्या खाडीच्या किनारपट्टीजवळ, एक पाकिस्तानात, तर एक जम्मू-हिमाचल दरम्यान सक्रिय आहे. मागील २४ तासांत हवामानात फारसा बदल झाला नसला, तरी पुढील तीन दिवसांत तापमानात २ अंश सेल्सियसपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
१० नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट पुढील काही दिवस राहणार आहे.
५ नोव्हेंबर: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होणार आहे.
६ नोव्हेंबर: ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
७ आणि ८ नोव्हेंबर: काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, त्यानंतर वातावरण स्थिर होण्याची शक्यता आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस राहील, असं कुलाबा वेधशाळेचं म्हणणं आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत पावसाची सक्रियता टिकेल. ५ नोव्हेंबरसाठी हवामान विभागाने सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुण्याचा अपवाद वगळता, या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची स्थिती
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलका पाऊस होऊ शकतो. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतही तुरळक पावसाची शक्यता आहे.नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे काही ठिकाणी मध्यम पाऊस, तर परभणी, बीड, हिंगोली, संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत हलका पाऊस होईल, असं हवामान विभागाचं म्हणणं आहे.
ला निनाचं संकट आणि थंडीची चाहूल
७ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचं आगमन होईल. मुंबई उपनगरांमध्येही पुढील दोन दिवसांत तापमान घटेल. 'ला निना' या हवामान घटनेमुळे यावर्षीचा हिवाळा मागच्या २५ वर्षांतील सर्वात थंड राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
या पावसामुळे आणि अचानक वाढणाऱ्या थंडीमुळे रब्बी पिकांची लागवड करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. पिकं पाण्यात बुडणार नाहीत यासाठी निचरा व्यवस्था सक्षम ठेवावी. थंडी वाढण्यापूर्वी गहू, हरभरा, मका आणि भाज्यांची पेरणी नियोजनबद्ध करावी. कीड आणि रोगांपासून संरक्षणासाठी योग्य फवारणी करावी. जमिनीतील आर्द्रता संतुलित ठेवण्यासाठी हलकं सिंचन द्यावं.
