हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळ काल तीव्र स्वरूपात विकसित झालं असून, आज ते अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतं. या वादळामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
advertisement
किती दिवस प्रभाव राहणार?
राज्य प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली असून, किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ७ ऑक्टोबरपर्यंत हवामान सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनाऱ्यावर समुद्रातील परिस्थिती अत्यंत धोकादायक राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. सध्या समुद्रात असलेल्या बोटी व नौकांना तात्काळ परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंदरातच बोटी सुरक्षित ठेवाव्यात आणि आवश्यक ते सर्व प्रतिबंधक उपाय करावेत, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तसेच किनारपट्टीवरील रहिवाशांनी भरतीच्या काळात सावधगिरी बाळगावी, पाणी साचलेल्या ठिकाणी जाणं टाळावं, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने केवळ किनारपट्टीपुरतं नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर कोकणातील सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन स्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
चक्रीवादळामुळे सोसाट्याच्या वाऱ्यांचा वेग वाढणार, लाटा उंचावणार आणि समुद्र अधिक अस्थिर होणार असल्याने मुंबईसह किनारपट्टीवरील सर्व बंदरं उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आली आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील काही भागांत भरतीदरम्यान पाणी घरात घुसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यांवर दिसून येईल. पुढील काही दिवसांत हवामान अधिक अस्थिर राहू शकतं. त्यामुळे शेतकरी, मच्छिमार आणि किनारी भागातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.