बंद होणार होती ZP शाळा, आज ठरली जगातली नंबर वन School, प्रत्येक पालकाने पाहावी अशी स्टोरी! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुण्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जगभरात आपला झेंडा फडकावला आहे. या शाळेने वर्ल्ड बेस्ट स्कूल हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.
पुणे: जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, तिथं शिक्षणाची गुणवत्ता नाही, मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरच भवितव्य उज्ज्वल होईल, अशा अनेक गैरसमजुती समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. पण या गैरसमजांना खोडून काढत खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जगभरात आपला झेंडा फडकावला आहे. या शाळेने वर्ल्ड बेस्ट स्कूल हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असणारी शाळा ते आता जगातील नंबर वन शाळा हा प्रवासबद्दल शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे यांनी याबद्दल लोकल 18 ला माहिती दिली आहे.
जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेने T4 Education (UK) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. लोकसहभागातून शाळा विकास या विभागात शाळेने सहभाग घेतला होता. याआधी, जून महिन्यात जालिंदरनगर शाळा जगातील पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवत होती. मात्र, जागतिक समुदायाने केलेल्या मतदानानंतर जगातील पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून जालिंदरनगर शाळेची अधिकृत घोषणा करण्यात आली. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या 16 व 17 तारखेला अबुधाबी येथे होणाऱ्या विशेष समारंभात एक कोटी रुपयांचा पुरस्कार देऊन शाळेला गौरविण्यात येणार आहे.
advertisement
कशी आहे जगातील नंबर वन शाळा?
दत्तात्रय वारे यांनी सांगितले की, आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकांचे धडे शिकवले जात नाहीत, तर त्या गोष्टींचं प्रत्यक्ष ज्ञान दिलं जातं. इथे रोबोटिक्स, कोडिंग, फ्रेंच आणि जपानी भाषा शिकवली जाते. तसेच आरी वर्क, मेकॅनिकल वर्कशॉप, इलेक्ट्रॉनिक्स, सुतारकाम, चित्रकला यांसारख्या अनेक कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. या शाळेतील दुसरी-तिसरीतील विद्यार्थी सुद्धा कोडिंग करतात. जरी ही शाळा पहिली ते चौथीपर्यंतची असली, तरी तिच्या शिक्षण पद्धतीने प्रभावित होऊन चौथीपुढील अनेक विद्यार्थी ओपन स्कूल पद्धतीने इथे शिक्षण घेतात. या शाळेवर संदीप म्हसुडगे हे मुख्याध्यापक आणि दत्तात्रय वारे हे शिक्षक आहेत.
advertisement
ज्या शाळेला जाण्यासाठी रस्ताही नीट नाही, एका ओसाड माळरानावर सुरू झालेली ही शाळा काही महिन्यांपूर्वी बंद होण्याच्या यादीत होती. मात्र, शिक्षकांच्या मेहनतीमुळे आणि गावकऱ्यांच्या सहभागामुळे ही शाळा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारी ठरली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 04, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
बंद होणार होती ZP शाळा, आज ठरली जगातली नंबर वन School, प्रत्येक पालकाने पाहावी अशी स्टोरी! Video