पावसानंतर तापमानात घसरण
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याचा प्रभाव दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या भागांवर दिसेल. ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान या भागात ७ ते ११ सें.मी. इतक्या अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
दरम्यान, उत्तरेकडील भागात पश्चिम विक्षोभ सक्रिय झाला असून त्यामुळे थंड वारे देशाच्या मध्य आणि उत्तर भागाकडे सरकू लागले आहेत. पुढील तीन दिवसांत उत्तर भारत आणि मध्य भारतात तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरपासून हळूहळू “गुलाबी थंडी” जाणवेल.
advertisement
पावसाचा जोर कमी होणार
आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल, मात्र वातावरणात थंडीची चाहूल लागेल. विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे विभागात किमान तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर आणि अंकुरणावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः हरभरा, गहू, ज्वारी आणि कांदा यांसारख्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीमध्ये रब्बी पिकांची कशी काळजी घ्यावी?
मातीतील ओल टिकवण्यासाठी मल्चिंग करा
पिकांच्या मुळांजवळ शेणखत, काडीकचरा किंवा गवत टाकल्यास ओलावा टिकून राहतो आणि मुळांना थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळते.
दवामुळे बुरशीजन्य रोग टाळा
सकाळी दव पडल्यामुळे हरभरा आणि गव्हाच्या पिकात पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. वेळेवर तणनियंत्रण आणि रोगनाशक फवारणी करा.
सिंचनाचं योग्य नियोजन ठेवा
पिकांच्या वाढीच्या टप्प्यात जास्त पाणी देऊ नका. थंडीच्या काळात कमी पण योग्य वेळी सिंचन करा. तसेच शेताच्या कडेला झुडपं, झाडं किंवा प्लास्टिक शीटचा वापर करून थंड वाऱ्याचा थेट फटका पिकांना बसू देऊ नका.
कांदा, हरभरा, गहू पिकासाठी विशेष लक्ष द्या
ही पिकं थंडीला संवेदनशील असतात. त्यामुळे रात्री तापमान जास्त घटल्यास हलकी सिंचन फवारणी करून तापमान संतुलित ठेवा.
