सांगली : बदलत्या हवामानामुळे एकीकडे राज्यात शेतीचे नुकसान होत आहे. मात्र सांगलीचा शेतकरी पित-पुत्राने आधुनिक पद्धतीने उसाची शेती केली आहे. त्यांनी एकरी तब्बल 158 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. सांगलीच्या आवर्षणग्रस्त खानापूर तालुक्यातील विटा सूर्यनगर येथील प्रगतशील शेतकरी केदारी सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा बलराम सूर्यवंशी गेल्या चार वर्षांपासून ऊस शेतीचे करेक्ट व्यवस्थापन करत आहेत. पाहुयात अनुभवी पित्याने अन् वकिलीचे शिक्षण घेत मातीत कष्ट करण्याची तयारी ठेवलेल्या पुत्राने केलेले ऊस व्यवस्थापन.
advertisement
केदारी सूर्यवंशी यांची माळरानावरची मुरमाड जमिन आहे. परंतु योग्य व्यवस्थापन केले तर मुरमाड शेत जमिनीतही उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते हे विट्यातील सुर्यनगरच्या सूर्यवंशी पिता- पुत्राने सिद्ध करून दाखवले आहे. केदारी सूर्यवंशी यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे. त्यामुळेच आजवर त्यांनी भाजीपाल्याची प्रयोगशील शेती केली आहे. परंतु अधिक व्याप, वातावरण आणि मार्केटच्या अनिश्चिततेमुळे होणारे प्रचंड नुकसान यामुळे त्यांनी भाजीपाल्याच्या शेतीस रामराम ठोकला. आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत आठ एकरात उसाची लागवड केली. सूर्यवंशी कुटुंबामध्ये पूर्वीपासूनच उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु गेल्या चार वर्षांपासून आधुनिक पद्धतीने ऊस शेती करत आहेत.
सोलापूरच्या शेतकऱ्याची कमाल! गायींचे शेण विकून बांधला 1 कोटी रुपयांचा अलिशान बंगला
सुरुवातीला त्यांनी शिमला मिरचीच्या उभ्या पिकामध्ये रोटर मारत मिरचीचे पीक मातीत गाडले होते. त्यामुळे शेताला भरपूर प्रमाणात हिरवळीचे खत मिळाले. त्यानंतर मशागत करून 86032 या ऊस वाणाची लागवड केली होती. शेती अभ्यासक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी खते, पाणी आणि फवारण्यांचे व्यवस्थापन केले होते. वातावरणातील बदल, रोगराई यांना वेळच्यावेळी आळा घालत पिता पुत्राने एकरी तब्बल 158 टनाचे विक्रमी उत्पादन घेतले.
सध्या केली आहे 10 हजार 1 वाणाची लागवड
सलग तीन वर्ष 86032 चे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर सूर्यवंशी पिता-पुत्राने आता ऊस वाण बदलले आहे. सध्या त्यांनी आपल्या शेतामध्ये 10 हजार 1 या ऊस वाणाची लागवड केली आहे. ही लागवड जोमात असून एकरी 120 टनादरम्यान उत्पादन निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यवस्थापनाचे काटेकोर पालन हाच यशाचा मंत्र
ऊस उत्पादनासाठी आम्ही प्रसिद्ध ऊस संशोधक सुरेश माने पाटील यांचा सल्ला घेत आहोत. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ऊसाचे सर्व व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे करत आहोत. यामुळेच विक्रमी उत्पादन आणि उत्पादकता टिकून ठेवणे शक्य झाले असल्याचे बलराम सूर्यवंशी यांनी सांगितले. घरच्या ट्रॅक्टरने केदारी सूर्यवंशी स्वतःच मशागत करतात. योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणे, ठिबक द्वारे पाण्याचे योग्य नियोजन याचा सुरेख मेळ घालत असल्यानेच ऊस उत्पादन एकरी 120 टनादरम्यान टिकवून ठेवता आल्याचे सूर्यवंशी पिता-पुत्राने सांगितले.
शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हे सूर्यवंशी पिता-पुत्रांनी सिद्ध करून दाखवले आहे.