सांगली: शेतकऱ्यांना नेहमीच आस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कधीकधी हातातोंडाशी आलेला घास देखील हिसकावला जातो. असाच काहीसा प्रसंग सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी विठ्ठल पाटील यांच्याबाबत घडला आहे. विक्रीसाठी तयार झालेली द्राक्षे व्यापाऱ्यांनी 100 ते 125 रुपयांनी मागितली होती. चार दिवसांत द्राक्षे काढणार होते. अशातच एका रात्री वटवाघळांच्या झुंडीने हल्ला केला आणि संपूर्ण बागच फस्त केलीये. यामध्ये 10 टन पेक्षा जास्त द्राक्षे फस्त केली असून जवळपास 8 लाखांचं नुकसान झालंय.
advertisement
तासगाव तालुका हा द्राक्ष उत्पादकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील हातनुर येथे शेतकरी विठ्ठल पाटील यांची द्राक्षांची बाग आहे. त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात सोनाका जातीची द्राक्षबाग लावलीये. हंगामाच्या सुरुवातीला दर चांगला लाभेल या आशेवर त्यांनी आगाप फळछाटणी घेतली होती. आता माल तयार झाला असून येत्या चार दिवसांत मालाची विक्री करण्याची तयारी सुरू होती. यातच द्राक्ष बागेवर शेकडो वटवाघळांनी हल्ला चढवत एका रात्रीत बागेतील द्राक्षे फस्त केली.
एक एकरमध्ये 90 दिवसांत 2 लाखांचा नफा, हे पीक ठरलं बीडमधील शेतकऱ्यासाठी वरदान, Video
एका रात्रीत 10 टन द्राक्षे फस्त
या हल्ल्यात वटवाघुळांनी बागेमध्ये एक सिंगल द्राक्ष घडही शिल्लक ठेवला नाही. सकाळी नेहमीप्रमाणे द्राक्ष बागेत गेलो असता हे विदारक चित्र निदर्शनास आलं. त्यामुळे जागेवरच चक्कर आली. अशा आस्मानी संकटाला तोंड देण्याची वेळ आमच्यावर आलीये. या बागेतून सुमारे 8 ते 10 टन माल निघेल अशी स्थिती होती. वटवाघळांनी बागेतील सर्व तयार माल फस्त केल्याने सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले आहे, असे शेतकरी पाटील यांनी सांगितले.
साडेसहा लाखांचा खर्च वाया
या द्राक्ष बागेसाठी विठ्ठल पाटील यांनी साडेसहा लाख रुपये खर्च करून या सीजनलाच प्लास्टिक पेपरचे आवरण तयार केले होते. याशिवाय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निसर्गाशी झगडत मोठ्या मेहनतीने पीक छाटणी घेतली होती. पाच ते सहा लाख रुपये खर्च करत महागडी औषधे, खते वापरून द्राक्षाचा माल तयार केला होता. ही तयार द्राक्षे चार दिवसात विक्रीसाठी जाणार होती. 100 ते 125 रुपये किलोने या मालाला मागणी आली होती.
5 एकरात मिळत नाही, तेवढं उत्पन्न 18 गुंठ्यात; मिरची शेतीतून शेतकरी कसा झाला मालामाल?
वटवाघळांनी केले होते 2 एकर बागेचे नुकसान
चार वर्षांपूर्वी मांजर्डे रोडवरील महादेव शंकर पाटील यांच्या दोन एकर द्राक्ष बागेचे असेच वटवाघळांच्या कळपाने नुकसान केले होते. आस्मानी संकटाची पुनरावृत्ती झाल्याने शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. वटवाघळांच्या हल्ल्या सारख्या घटनांना प्रतिबंध म्हणून द्राक्ष बागायतदारांसह सर्वच फळ पीक बागायतदारांनी योग्य ती दक्षता घेणे गरजेचे असल्याचे बागायतदार विठ्ठल पाटील यांनी सांगितले.
द्राक्ष बागायतदारांना आवाहन
“इथून पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी बागेचे संरक्षण म्हणून बागेभोवती संपूर्ण जाळी लावावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 80 दिवसानंतर द्राक्ष बागेच्या भोवती हॅलोजन लावावेत. हॅलोजनचा लाईट पडल्यानंतर वटवाघुळे नुकसान करू शकत नाहीत,” असं पाटील सांगतात. दरम्यान, गेली पाच ते सहा वर्षे झाली अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. लाखो रुपयांचे कर्ज झाल्याने द्राक्ष बागायतदारांवर मोठं संकट कोसळलंय. प्रशासनाकडून योग्य मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये.