सोलापूर: प्रत्येक स्वयंपाक घर आणि औषधांच्या निर्मितीत आले नेहमीच भाव खातात. परंतु, आता आल्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहेत. नेहमी सोन्याचे मोल असणारे आले आता मातीमोल झाले असून शेतकऱ्यांवर संकट कोसळलंय. अगदी खर्चही निघत नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केलीये. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्याची आवक वाढली असून बाजारात 2700 ते 3200 रुपये प्रतिक्विंटल दराने अद्रक विकले जातेय.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील काही भागात आल्याची शेती केली जाते. आल्याला चांगला दर असल्याने शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे राहतात. त्यामुळे यंदा पंढरपूर, माळशिरससह काही तालुक्यांत गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी अधिक लागवड झाली. परंतु, बाजारात आवक वाढल्याने आल्याचे दर कोसळले. याबाबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अद्रक व्यापारी सुलेमान बागवान यांनी माहिती दिली आहे.
Banana Farming: ऊस शेतीला फाटा, 70 गुंठ्यात लावलं पैशाचं पीक, पहिल्याच वर्षी रेकॉर्ड ब्रेक कमाई!
मागणी कमी, आवक जास्त
गेल्या 2-3 वर्षांत अद्रकला चांगले दर मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आले शेती मोठ्या प्रमाणात केली. त्यामुळे सोलापूर मार्केटमध्ये आल्यांची आवक वाढली आहे. परंतु, बाहेर राज्यातून आल्याची मागणी कमी झालीये. त्यामुळे प्रतिक्विंटल 2700 ते 3200 रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. बाहेर राज्यातील मागणी वाढल्यास पुन्हा अद्रकला चांगला भाव मिळेल. विशेषत: बेंगलोरहून आल्यांना मोठी मागणी असते. तिकडून मागणी वाढली तर सोलापूर बाजारात आल्याला चांगला दर मिळेल, असं व्यापारी बागवान यांनी सांगितले.
अद्रकचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून अद्रक बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी पाठवला जातो. मात्र सध्या अद्रकला मागणी नसल्यामुळे अद्रकचे दर कोसळले आहेत. 50 ते 60 टक्क्यांनी दर घसरल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसून शेतकरी संकटात आहे.