बीड: सध्याच्या काळात अनेक शेतकरी तरकारी पिकांच्या शेतीकडे वळत आहेत. ही शेती बेभरवशाची मानली जात असली तरी योग्य नियोजन केल्यास यातून चांगले उत्पन्न घेता येते. बीडमधील शेतकरी राजेभाऊ पवार यांनी आपल्या 18 गुंठे क्षेत्रात मिरचीची शेती केलीये. गेल्या 5 वर्षांपासून ते मिरची शेती करत असून यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळतंय. यंदा या 18 गुंठे मिरची शेतीतून साडेतीन लाखांपर्यंत कमाई होईल, असं लोकल18 सोबत बोलताना त्यांनी सांगितलंय.
advertisement
बीडमधील नित्रुडचे शेतकरी राजेभाऊ पवार यांच्याकडे 10 एकर शेती आहे. ते पूर्वापार पारंपरिक पिकांची शेती करत आहेत. या शेतीतून त्यांना उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मिरचीची शेती करण्याचा मनोदय घरात बोलून दाखवला. मात्र, कुटुंबीयांनी याला विरोध केला. शेवटी कुटुंबीयांच्या संमतीने 18 गुंठे क्षेत्रात मिरचीची लागवड करण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी या मिरची शेतीतून 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचं राजेभाऊ पवार सांगतात.
कडू कारल्याने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडावा, अडीच एकरात केली लागवड, आता लाखोंची कमाई
मिरची शेतीतून पहिल्याच वर्षी पाच एकरात मिळत असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. त्यामुळे कुटुंबीयांचा विरोध मावळला. आता गेल्या 5 वर्षांपासून मिरचीची शेती करत आहे. यंदा देखील मिरची लागवड केलीये. आता मिरचीची तोडणी सुरू आहे. बाजारात 40 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. तरीही मिरचीची शेती परवडत आहे. आतापर्यंत 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून पुढील काही तोडीत किमान दीड लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज आहे, असेही शेतकरी पवार यांनी सांगितले.
दरम्यान, बीडसारख्या अवर्षणग्रस्त भागात मिरची शेती हा उत्तम पर्याय आहे. आतापर्यंत मला नुकसान झालं नाही. परंतु, योग्य व्यवस्थापन केल्यास नुकसानीची शक्यता कमी होते. त्यामुळे मिरचीची शेती फायद्याची ठरत असल्याचेही शेतकरी राजेभाऊ सांगतात.