जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गाढे सावरगाव येथील भागवत डोंगरे या शेतकऱ्याने फळगळ आणि बाजारभाव मिळत नसल्याने हतबल होऊन दोन हेक्टर क्षेत्रावरील 740 मोसंबीच्या झाडांची बाग तोडून टाकली आहे. मागील काही वर्षांपासून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या मोसंबी फळबागांची मोठी फळगळ होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.
advertisement
मोसंबीला स्थानिक आणि इतरत्र उपलब्ध बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही हातात पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर या फळबागा तोडून टाकण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या परिस्थितीत मोसंबी बागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना वेळप्रसंगी टँकरने पाणी आणून द्यावे लागते. त्यामुळे उसनवारीदेखील करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली. सध्या मृग बहरातील फळे तोडणीला आली आहेत. परंतु, भावात मोठी घसरण झाल्याने मोसंबी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, चेकनेट बोरांनी आणला जीवनात गोडावा, शेतकऱ्याची लाखोंची कमाई
मोसंबीला बाजारपेठेत अतिशय कमी भाव मिळत आहे. दोन ते चार रुपये प्रति किलो या दराने मोसंबीची विक्री करणे परवडत नसल्याने मोसंबी बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी भागवत डोंगरे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्याला मोसंबी शेतीचं हब मानलं जातं. परंतु बाजारात मोसंबीला मिळत असलेला कवडीमोल दर आणि मोसंबी बागांवर येत असलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती यामुळे मोसंबी बागा जगवणे बागायतदारांना कठीण होत आहे. यामुळे अनेक बागायतदार मोसंबी बागा जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्याला पसंती देत आहेत. मोसंबी उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन धोरण करते मोसंबी उत्पादकांना दिलासा देणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
दोन हेक्टर क्षेत्रावरील मोसंबीची 740 झाडांची बाग प्रतिकूल परिस्थितीत जगवली, वेळोवेळी रासायनिक खताच्या मात्रा, आंतरमशागत करून बागेचे व्यवस्थापन केले. मागील चार वर्षांपासून फळगळीची समस्या वाढू लागली. त्याचबरोबर मोसंबीला मिळणाऱ्या बाजारभावात कमालीची घसरण होत असल्याने ही फळबाग ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे जेसीबी फिरवला आहे, असे गाढे सावरगाव येथील शेतकरी भागवत डोंगरे यांनी सांगितले.