बीड : मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. मराठवाड्यात तर हवामानशास्त्र विभागाकडून एकामागून एक पावसाची शक्यता वर्तविली जातेय आणि इथं तसाच जोरदार पाऊसही सुरू आहे.
2 सप्टेंबरला बीड जिल्ह्यात दिवसभर पाऊस कोसळला. यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंच, परंतु शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं पिकांचे हाल झाले. सोयाबीन, कापूस, मूग, इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालंय. पाणी साचल्यानं कापसाचं पीक पुरतं सडलं, तर सोयाबीन मूग पाण्याखाली जायची वेळ आलीये.
advertisement
शेतकरी अगदी लेकरासारखी आपल्या पिकांची काळजी घेतात. यंदा पदरमोड करून पिकांवर खतं, औषधं फवारणी केली होती. चांगलं उत्पादन मिळावं यासाठी खूप मेहनत घेतली होती, मात्र पावसानं साऱ्या आशा ओल्याचिंब केल्या. डोळ्यांदेखत पिकांचं नुकसान झालेलं पाहून शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. सरकारनं पिंकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.
दरम्यान, बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकूणच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. येत्या आठवड्यात मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.