अंजनगाव बारी येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांनी लोकल18 शी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, 20 जून 2025 रोजी मी 8 एकर क्षेत्रात सोयाबीन आणि तूर पिकाची लागवड केली. तुरीची लागवड ही टोकण पद्धतीने बेडवर केली होती. त्यातीलच सोयाबीन हे पूर्णतः नष्ट झालं. हाती 1 रुपया सुद्धा आला नाही. पण, तूर ही बेडवर असल्याने वाचली. सद्यस्थितीमध्ये तूर ही अतिशय सुदृढ आणि बहरलेली आहे.
advertisement
YouTube वर माहिती पाहिली, डोंगराळ भागात शेतीचं धाडस दाखवलं, वर्षाला 11 लाखांची कमाई
तूर पिकाची लागवड कशी केली?
याबाबत ते सांगतात की, 8 एकर क्षेत्रात मी तूर लागवड ही बेडवर केली. 5 फूट अंतरावर बेड तयार केले. त्यानंतर टोकण पद्धतीने तूर लागवड केली. तुरीचे बियाणे देखील घरगुतीच वापरले. मागील वर्षीची शेतातील तूर घेऊन त्यावर बीजप्रक्रिया केली आणि बियाणे पेरणीसाठी वापरले. यामध्ये तूर पीक हे तासी म्हणजेच अर्धा ते पाऊण फूट अंतरावर लावलेली आहे. लागवड करण्याआधीच बेडवर कोंबडी खताचा पातळ थर दिला. त्यानंतर कोंबडी खत आणि पंचामृत फवारणी 4 वेळा केली. या दोन्हीच्या आधारे आज तुरीची स्थिती सुदृढ आहे. यावर कोणताही रोग नाही. तसेच वाढ देखील 8 फूट पर्यंत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
एकरी 10 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा
पुढे ते सांगतात की, सध्याची तुरीची स्थिती बघता मला एकरी 10 क्विंटल तूर पिकाची अपेक्षा आहे. कमीत कमी खर्चात यावर्षी तूर पीक बहरले आहे. सोयाबीनचा खर्च देखील यातून निघेल अशी आशा आहे. पुढेही तुरीवर रोग येणार नाही, याची काळजी घेणे देखील सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.





