सुभाष काकडे हे मागील तीन वर्षांपासून ड्रगन फळाची शेती करत आहेत. त्यांच्या शेतात मलेशियन पर्पल रेड, व्हिएतनाम रेड आणि जम्बो रेड अशा तीन प्रकारच्या ड्रगन फळांचे उत्पादन घेतले जाते. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये त्यांच्या ड्रगन फळांना चांगली मागणी आहे. मात्र, नियमित सिझनमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने दरात मोठी चढउतार होत असल्याचा अनुभव त्यांना आला. त्यामुळे वेगळा काही प्रयोग करता येईल का? या विचारातून त्यांनी ऑफ-सिझन उत्पादनाचा अभ्यास सुरू केला.
advertisement
संशोधन करत असताना त्यांना लक्षात आले की व्हिएतनाम आणि चीनमध्ये ड्रगन फळासाठी आर्टिफिशियल लाइटिंगचा वापर करून ऑफ-सिझन उत्पादन घेतले जाते. ड्रगन फळाला कृत्रिम प्रकाश दिल्यास फुलधारणा आणि फळधारणा लवकर होते. या पद्धतीसाठी लागणारे विशेष बल्ब भारतात सहज उपलब्ध नसल्याने त्यांनी हरियाणातील एका स्थानिक कंपनीकडून हे बल्ब मागवले. त्यानंतर दोन एकर क्षेत्रावर हा प्रयोग राबवण्यात आला.
या प्रयोगामुळे ऑफ-सिझनमध्ये 5 ते 6 टनांपर्यंत ड्रगन फळाचे उत्पादन अपेक्षित आहे. जरी हे उत्पादन सिझनपेक्षा कमी असले, तरी ऑफ-सिझनमध्ये दर तीन ते चार पट अधिक मिळत असल्याने आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. आर्टिफिशियल लाइटिंगच्या माध्यमातून दरवर्षी 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती सुभाष काकडे यांनी दिली.
भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक क्षेत्रावर ड्रगन फळाचे ऑफ-सिझन उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेतीतूनही शाश्वत आणि फायदेशीर उत्पन्न मिळू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.





