मार्केटयार्डात सध्या आंब्याची आवक अत्यल्प प्रमाणात होत असून मागील वर्षांच्या तुलनेत परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मागील वर्षी ज्या ठिकाणी सुमारे 5 हजार पेट्यांची आवक होत होती, त्या तुलनेत यंदा अवघ्या 150 ते 200 पेट्यांवरच बाजार मर्यादित राहिला आहे. एकूण आवकही 70 टक्क्यांवरून थेट 30 टक्क्यांपर्यंत घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
advertisement
Mango Rate: गुढीपाडव्याला ‘हापूस’ महागला; आंबा बाजारात तेजी, एका डझनाचे दर किती?
सध्या बाजारात उपलब्ध असलेले तयार आंबे हे प्रामुख्याने एक्स्पोर्ट क्वालिटीचे असून त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरही गगनाला भिडले आहेत. तयार आंब्यांचे दर प्रतिडझन 2000 ते 3500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर कच्च्या आंब्यांसाठीही ग्राहकांना 1500 ते 2500 रुपये मोजावे लागत आहेत. या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंबा खरेदी करणे कठीण झाले आहे.
कोकणात उत्पादन घटलं
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिला. सुरुवातीला आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, त्यानंतर तापमानातील चढ-उतार, दमट हवामान आणि थ्रिप्स व तुडतुड्या (हॉपर) या किडींच्या प्रादुर्भावामुळे मोहोरावर परिणाम झाला. परिणामी उत्पादनात तब्बल 60 ते 70 टक्क्यांची घट झाली.
व्यापारी बलराज भोसले यांच्या मते, सध्या बाजारात आंब्याचा तुटवडा आहे. पाडव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी पुरवठा अपुरा आहे. 1 एप्रिलनंतर आवक वाढण्याची शक्यता असून त्यानंतरच पुणेकरांना आंब्याचा आस्वाद घेता येईल.
दरम्यान, वाढत्या किमती आणि कमी उपलब्धता यामुळे यंदा सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखण्यासाठी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘हापूस’चा हंगाम यंदा उशिरा रंगणार असून पुणेकरांच्या गोड अपेक्षांवर पाणी फिरल्याचे दिसून येत आहे.





