सिंधुदुर्ग - गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसधळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गाचा जिल्ह्यात कुडाळ तालुक्यासह जिल्ह्याभरात मागील 4 दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा सर्वाधिक तडाका भात पिकाला बसला आहे. याचबाबत लोकल18 ने घेतलेला हा आढावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पिकलेल्या कापणीयोग्य भाताचे पीक भिजले तसेच उभे भात पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेतीचे सुमारे 79.90 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिल्यातील 35 गावांचा समावेश आहे. एकूण 165 शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसान झाले आहे.
advertisement
यामध्ये कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील शेतकरी संजय परब यांच्या 1 एकर शेतीचे सुमारे 2 ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. तर कणकवली येथील सत्यवान राणे या शेतकऱ्याचे 20 गुंठे भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपाने हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
एकेकाळी ट्रॅक्टरवर केले काम, आज दिवसाला 60 हजार रुपयांची कमाई, बीडमधील तरुणाची भन्नाट कहाणी
जुलै महिन्यात आलेल्या पुरातही भात शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. आता गेले 4 दिवस कुडाळसह जिल्ह्याभरात धुवाधार पाऊस कोसळला आहे. तसेच आता पुन्हा पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच पावसाच्या तडाख्यात भात शेती सापडली आहे.
जुलै महिन्यातील मुसळधार पावसाने तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुराचे पाणी नदी किनारी असलेल्या भात शेतीत शिरून लावणी वाहून आणि कुजून गेली होती. तर आता परतीच्या पावसाने उभे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आता हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे त्यामुळे आम्ही करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.