मागील वर्षी सततच्या हवामान बदलाने आले पिकावर मोठ्या प्रमाणात कंदकुजीसारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु मोहिते यांच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे यांनी सांगितले.
निरोगी आले
प्रयोगशील शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी योग्य व्यवस्थापनाने आले शेती उत्तम ठेवली आहे. सध्या प्रति गुंठा पाचशे किलो आले शेतात तयार आहे. परंतु आल्याचे बाजारभाव पूर्णपणे कोसळले असल्याने सध्या आले मार्केटला देऊन काहीच फायदा होणार नाही. यापेक्षा आणखी काही महिने आल्याची शेतातच जपणूक करून मार्केटचा अंदाज घेत आले काढणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
advertisement
आजवर एकरी इतका उत्पादन खर्च
बेणे: 1.5 लाख
शेणखत(10 ट्रॉली): 60 हजार
खते (रासायनिक आणि सेंद्रिय): 70 हजार
सिंचन व्यवस्था,मजूर व ट्रॅक्टर मेहनत: 1.5 लाख
खोडवा व्यवस्थापन कमी खर्चिक
आले बाजारभाव वाढीच्या प्रतिक्षेत असलेले शेतकरी खोडवा व्यवस्थापन करत आहेत. आले पिकाच्या व्यवस्थापनासाठी एकरी साडेचार लाख रुपये इतका प्रचंड खर्च असतो. परंतु आल्याचा खोडवा व्यवस्थापित करताना तुलनेने कमी खर्च येतो.
खोडवा ठेवण्याचे कारण
यंदा बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने बाधित क्षेत्रातील आले खोडव्यासाठी ठेवता येत नाही. यामुळे कोवळे आले देखील बाजारात दाखल झाले आहे. आवक वाढल्याने सध्या बाजार भाव पडले असले तरी फार कमी निरोगी आल्याचे प्लॉट शिल्लक राहिले आहेत. यामुळे काही महिन्यानंतर सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत सुधारू शकतात. चालू बाजारभावानुसार आले विकल्यास उत्पादन खर्च देखील मिळणार नाही, असे आले उत्पादक शेतकरी सांगतात.
आले खोडवा नियोजन
आले उत्पादक शेतकरी राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांसाठी आले पिकाचे खोडवा नियोजन केले जाते. मोहिते यांनी मे जून जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यांसाठी खोडव्याचे नियोजन केले आहे.
मे महिन्यामध्ये खोडव्याची भांगलन करून तज्ञांच्या सल्ल्याने बेसल डोस देऊन भरणी केली जाते. आवश्यकतेनुसार फवारण्या आणि पाण्याचे नियोजन करून चार महिन्यांमध्ये दहा टक्के उत्पादन वाढवता येते. आले खोडवा नियोजन करून भाववाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी दीड लाखांचा खर्च करावा लागत आहे. संयमाची परीक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाचा दिलासा मिळेल का? हे येणाऱ्या काळात पाहणे आवश्यक आहे.





