गोड वासाने आकर्षित होणारे कीटक
बीड जिल्ह्यातील पर्यावरण तज्ज्ञ भारत आपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिकलेल्या सीताफळाचा गोड वास अनेक कीटकांना आकर्षित करतो. मुंग्या, भुंगे, विविध किडे या फळांभोवती जमा होतात. या कीटकांवर जगणारे सरडे, बेडूक आणि लहान प्राणी झाडावर येतात. या शिकार पकडण्यासाठी साप देखील झाडावर पोहोचतो. नैसर्गिक अन्नसाखळीच्या या प्रक्रियेमुळेच हंगामात सापांची उपस्थिती वाढते.
advertisement
Solapur Flood: 'संसार वाहून गेला, रस्त्यावर आलो, सरकार मात्र झोपेत!' पुरग्रस्त महिलेचा टाहो
पक्षी आणि सापांचा शिकार-शिकारी खेळ
सीताफळ खाण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी झाडांवर दिसते. हे पक्षी सापांचे सहज शिकार असतात. त्यामुळे पक्षी पकडण्यासाठी साप फांद्यांवर चढतात. त्यातच झाडाची दाट पाने आणि सावली सापांना लपण्यासाठी आदर्श ठरते. त्यामुळे दिवसा सुरक्षित आसरा आणि रात्री शिकार अशी दुहेरी सोय सापांना झाडावर मिळते.
उंदीर आणि पावसाळ्यानंतरची हालचाल
शेतशिवारात गळून पडलेली फळे खायला उंदीर येतात. हे उंदीर पकडण्यासाठी साप झाडाखाली किंवा जवळपास वावरतात. त्याचबरोबर पावसाळ्यानंतरचा काळ हा सापांच्या हालचालीसाठी पोषक मानला जातो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागात सीझनमध्ये सापांची वर्दळ अधिक प्रमाणात दिसते. अनेक शेतकरी आणि गावकऱ्यांनी अशा घटनांचा अनुभव घेतल्याचे सांगितले जाते.
काळजी घेणे आवश्यक
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की सीताफळ तोडताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे. झाडावर चढण्याआधी किंवा फळे तोडण्याआधी झाड हलवून पाहावे. लांब काठीच्या साहाय्याने फळे तोडावीत. साप दिसल्यास शांतपणे दूर व्हावे कारण साप हा निसर्गातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असल्याने त्याचे संरक्षण गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास स्वादिष्ट सीताफळाचा आनंद घेताना सुरक्षितताही राखता येऊ शकते.