मुंबई : जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा धक्का मानला जाणारा निर्णय घेत चीनने सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेतून एकही टन सोयाबीन आयात केलेले नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर प्रथमच चीनची अमेरिकी सोयाबीन आयात पूर्णपणे शून्यावर आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत चीनने अमेरिकेतून १.७ दशलक्ष टन सोयाबीन आयात केले होते, परंतु यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
advertisement
चीनच्या सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी सोयाबीनवरील उच्च आयात शुल्क आणि अमेरिकेतील मागील हंगामातील माल आधीच विकला गेल्याने सप्टेंबर महिन्यात कोणतीही नवीन खरेदी झाली नाही. त्यामुळे चीनने अमेरिकी बाजारपेठेकडे पाठ फिरवली, आणि आपले लक्ष दक्षिण अमेरिकेकडे वळवले आहे.
याउलट, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांहून चीनची सोयाबीन आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ब्राझीलहून आयात ३० टक्क्यांनी वाढून १०.९६ दशलक्ष टनांवर, तर अर्जेंटिनाहून आयात ९१ टक्क्यांनी वाढून १.१७ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. यामुळे चीनच्या एकूण सोयाबीन आयातीचा आकडा १२.८७ दशलक्ष टनांपर्यंत गेला असून, हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा मासिक आकडा ठरला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेसोबत व्यापार करार न झाल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत चीनमध्ये सोयाबीनची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण दक्षिण अमेरिकेतील पीक हंगाम एप्रिलपासून सुरू होतो, आणि अमेरिकेतून आयात बंद झाल्याने त्या काळात पुरवठ्याचा तुटवडा जाणवू शकतो. चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयात करणारा देश आहे आणि त्याची वार्षिक मागणी सुमारे १०० दशलक्ष टनांहून अधिक आहे.
अमेरिकी आयात थांबवण्यामागे फक्त आर्थिक नव्हे, तर राजकीय आणि धोरणात्मक कारणे देखील आहेत. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने चीनवर लादलेल्या तंत्रज्ञान निर्यातीवरील निर्बंधांना चीनने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
चीनने वापरली अमेरिकेचीच रणनीती
जागतिक व्यापारयुद्धात अमेरिकेच्या पद्धतीचा वापर करत चीनने नवीन निर्यात नियंत्रण नियम लागू केले आहेत. या अंतर्गत, चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा दुर्मीळ धातूंवर आधारित वस्तू तयार करणाऱ्या परदेशी कंपन्यांना त्या वस्तू परदेशात पाठविण्यापूर्वी चीनकडून मंजुरी घ्यावी लागेल.
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन श्रीर यांनी सांगितले की, उदाहरणार्थ दक्षिण कोरियाची एखादी स्मार्टफोन कंपनी जर चीनमधून मिळालेल्या धातूंचा वापर करून फोन तयार करत असेल, तर तिला तो फोन ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांना विकण्यासाठी चीनची परवानगी घेणे बंधनकारक असेल.
तज्ज्ञांचे मत आहे की या नव्या धोरणामुळे जागतिक इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी वस्तूंच्या व्यापारात नवीन तणाव निर्माण होऊ शकतो. चीनने अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी वापरलेली ही रणनीती दोन्ही देशांमधील व्यापारयुद्धाला आणखी तीव्र स्वरूप देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, अमेरिकेच्या शेती उत्पादनांना विशेषतः सोयाबीन निर्यातीला मोठा फटका बसला असून, आगामी काही महिन्यांत या क्षेत्रातील जागतिक दर आणि पुरवठा साखळीवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.