सातारा - महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्ग हा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. या दुग्ध व्यवसायाच्या मदतीने आपले उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जातो. मात्र, याच दूध देणाऱ्या जनावरांना होणारा कासदाह हा एक महत्त्वपूर्ण आजार आहे.
यावर उपचार कसा होतो, त्याचबरोबर या आजाराचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हा आजार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, कोणती तपासणी करावी याबाबत आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डॉ. स्वाती साखरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. डॉ. स्वाती साखरे यांचे सूक्ष्मजीव शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कासदाह हा दूध देणाऱ्या जनावरांमध्ये होणारा एक महत्त्वपूर्ण आजार आहे. यामुळे शेतकऱ्याला दुधाचे उत्पादन कमी प्रमाणात होते. त्याचबरोबर दुधाची गुणवत्ता बिघडल्याने कित्येक वेळा दुध टाकून द्यावे लागते. कासदाहमुळे सणातील संपूर्ण ऊतकाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे जनावरांच्या उत्पादनक्षम आयुष्यात घट होते तथापि प्रतिजैविकाचा अनियंत्रित वापर केल्यामुळे सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होते. म्हणून योग्य आणि प्रभावी प्रतिजैविक निवडण्यासाठी नियमित तपासणी करणे आजच्या काळाची गरज बनले असल्याचे त्या म्हणाल्या.
याचे निदान कसे करावे -
स्ट्रीप कप चाचणी, कॅलिफोर्निया कासदाह चाचणी, प्रयोग शाळेत बाधित जनावरांच्या दुधातील जिवाणूंचे विलगीकरण करून ओळख करणे, प्रति जैविक संवेदनशीलता चाचणी देखील महत्त्वाची असते.
महाराष्ट्रातील असं गाव, जिथं कधीच विकलं जात नाही दूध, काय आहे यामागचं कारण?
कासदाहचा प्रसार कसा होतो -
कासदाहचा प्रसार प्रदूषित पाणी उपकरणे तसेच दूध काढणाऱ्या व्यक्तीमार्फत होतो. संसर्गजन्य घटकांच्या प्रत्येक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आल्यानंतर प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येते. बहुतेक वेळा जिवाणू हे शरीरांतर्गत निर्माण होणारच असतात. कास कातडी जननेंद्रियांचा बाह्यभाग इ. अवयवांमध्ये दिसतात. या प्रकारे त्याचा प्रसार होतो.
या आजाराची लक्षणे कसे ओळखाल -
बाधित सड किंवा सडाचा काही भाग सुजतो, स्पर्श कठीण वाटते, सडाच्या भागाला स्पर्श केल्यास किंवा दूध काढण्याच्या वेळी वेदना होतात. बाधित जनावरांचे दूध उत्पादनात अचानक घट निर्माण होते. दुधात गुठळ्या, पानदारपणा, पिवळसर किंवा रक्ताच्या धारा दिसतात. दुधाचा रंग किंवा घट्टपणा बदलतो. त्याचबरोबर गंभीर प्रकरणांमध्ये जनावरास ताप येण्यास सुरुवात होते, अशी माहिती त्यांनी दिली.
यावर तंतोतंत उपचार कसा केला जातो -
गायीच्या कासदाहला विविध जिवाणू कारणीभूत असतात. सर्वच जिवाणूंवर एकच प्रतिजैविक परिणाम करत नाही. प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणीमुळे कोणते प्रतीजैविक सर्वाधिक प्रभावी आहे, हे समजते. यामुळे योग्य आणि जलद उपचार जनावरांवर करता येतो.