महाराष्ट्रातील असं गाव, जिथं कधीच विकलं जात नाही दूध, काय आहे यामागचं कारण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
sangli news - दूध न विकण्या बद्दल गावकरी काय कारणे सांगतात? याची माहिती लोकल18ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येथील गावकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सोलापूर - सकाळी प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती दूध घेण्यासाठी दुकानावर, डेअरीवर जातो किंवा मग दूध विक्रेता घरीपोच द्यायलाही येतो. मात्र, महाराष्ट्रात एक गाव असं आहे, जिथे कधीच दूध विकत नाही. नेमके हे गाव कोणते आहे, यामागचे कारण काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील जुन्या सांगली-सातारा रोडवर सासपडे नावाचे गाव आहे. गावात सोयीसुविधां पोहोचल्या आहेत. मात्र, याच गावात आजही 'दुध न विकण्याची' समजही मानली जाते. या गावातील 75 टक्के लोक आजही दुध विकत नाहीत. दूध न विकण्या बद्दल सासपडेकर काय कारणे सांगतात? याची माहिती लोकल18ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येथील गावकऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या.
advertisement
सासपडे येथील वयस्कर आजी शालन पोळ म्हणाल्या की, "आमच्या गावात पूर्वीपासूनच दूध विकत नाहीत. दूध किंवा दुधाचा कुठला तरी पदार्थ विकला तरी आमच्या गाई-म्हैशी परत गाभण राहत नाहीत. त्यामुळे आम्ही जनावर फक्त शेणासाठीच पाळतो. शेणाचा वापर आपापल्या शेतात खत म्हणूनच करतो."
ज्येष्ठ नागरिक शामराव पोळ म्हणाले की, "दूध का विकत नाहीत? याचे नेमके कारण आम्हाला पण माहित नाही. पण आमच्या आजोबा-पणजोबांपासून दूध किंवा दुधाचा कुठलाच पदार्थ विकलेला आम्ही पाहिला नाही. दूध विकणे आपल्याला धार्जिणे नाही, असे आम्हाला पूर्वीपासून सांगितले आहे. अनेकदा आम्ही दूध विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकवेळी काहीतरी अपशकुन घडला. जनावरे घेण्यासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी खर्च केलेला पैसासुद्धा वसूल झाला नाही. अनेक लोक दूध विकण्याचा प्रयत्न करतात. पण असे काही आडवं लागल्यावर त्याचा नाद सोडून देतात."
advertisement
सासपडे येथील तरुण शेतकरी सचिन पोळ म्हणाले की, "अलीकडे दुधातून लोकांना भरपूर उत्पन्न मिळते. आम्हालाही वाटते दुधाचा व्यवसाय करावा. परंतु गावातील पूर्वीच्या अनेक लोकांचे दूध व्यवसायाबद्दलचे वाईट अनुभव आहेत. कोणाचा गोठा जळाला, कोणाच्या गाई- म्हैशी गाभण गेल्या नाहीत . यामुळे गावात दूध विक्री बद्दल भीती निर्माण झाली आहे. अलीकडे काही लोक दूध विक्री करत आहेत. मात्र, कडेपूरच्या डोंगराई देवीला कौल लावून देवीची परवानगी घेतात. देवीने परवानगी दिली तरच दूध विक्री करतात. पण ज्या लोकांना देवीने कौल देऊन मान्यता दिली नाही ते लोक दूध विकायच्या नादाला लागत नाहीत. जनावरे केवळ शेणखतासाठी म्हणूनच पाळतात," असे ते म्हणाले.
advertisement
सासपडे गावच्या परिसरामध्ये डोंगराई देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. याच डोंगराई देवीची दूध विक्रीसाठी परवानगी नसल्याचा सासपडेकरांचा पूर्वीपासूनचा समज आहे. दूध न विकण्याच्या वेगळ्या रुढीचा गावाच्या विकासावर थेट परिणाम झाल्याचे गावकरी मान्य करतात.
दुधामुळे आसपासच्या गावातील लोकांच्या घरात चार पैसे येतात. पण सासपडे येथील शेतकरी मात्र या पैशापासून दूर आहेत. एका प्रथेचा परिणाम थेट गावाच्या अर्थकारणावर झाला आहे. इथे दूध विकायचे नाव जरी काढले तरी लोक अनेक गुढ वाटणाऱ्या गोष्टी सांगत असतात.
advertisement
सूचना - ही माहिती स्थानिकांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कुठलाही दावा करत नाही.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 16, 2024 6:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
महाराष्ट्रातील असं गाव, जिथं कधीच विकलं जात नाही दूध, काय आहे यामागचं कारण?