बालाजी निरफळ (प्रतिनिधी) धाराशीव : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही अद्याप ती मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारकडे एक आगळीवेगळी मागणी केली आहे. ते म्हणाले की, “जर सरकारला दिवाळीपूर्वी मदत देता येत नसेल, तर सरकारनेच दिवाळी काही दिवस पुढे ढकलावी आणि त्यासाठी शासन निर्णय (जीआर) काढावा.” असं त्यांनी म्हंटलं आहे.
advertisement
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरवड्यातील हा चौथा अध्यादेश असून, मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी देण्यात येणार आहे. या अंतर्गत ३ लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८८ हजार १०७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईचा समावेश आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीनंतरच जमा होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष वाढत आहे.
जिल्हानिहाय मंजूर मदतनिधी
संभाजीनगर : ८१ कोटी ६२ लाख रुपये
बीड : ६७ कोटी २४ लाख रुपये
लातूर : ३५ कोटी ७२ लाख रुपये
परभणी : ४९ कोटी ४२ लाख रुपये
जालना : ६४ कोटी ७५ लाख रुपये
हिंगोली : ११ कोटी ३० लाख रुपये
नांदेड : ३६ कोटी २२ लाख रुपये
एकूण मदत : ३४६ कोटी ३१ लाख रुपये
गेल्या काही आठवड्यांत राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आला होता, घरांमध्ये पाणी शिरले होते, आणि हजारो लोकांचे संसार उघड्यावर आले होते. सर्वाधिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली, तर काहींची शेतीच वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.