बीड - यंदा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आता काल झालेल्या परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे. बेलगाव येथील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याचबाबत लोकल18 चा आढावा.
बीड जिल्ह्यात बेलगाव परिसरात झालेल्या पावसामुळे अगदी बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचले होते आणि कांदा पीक पाण्याखाली गेले. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागले आहे. कांद्याचे पिक वाया गेल्याने सुरुवातीला केलेला खर्चही निघाला नाही, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
advertisement
बीड जिल्ह्यात झालेल्या या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कांद्याचे उत्पादन कमी प्रमाणात झाले होते. तर यंदा अतिपावसामुळे कांदा पीक हातातून जाणार असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
परतीच्या पावसाने झोडपलं, केळी उत्पादनात मोठी घट, बीडमधील परिस्थिती चिंताजनक
काढणीवर आलेला पोळ कांदा, शेतात नुकताच महिनाभरापूर्वी लागवड झालेला रांगडा कांदा म्हणजेच लेट खरीप कांदा आणि उन्हाळी कांदा यांचे नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना घरचे कांदा बियाणे तयार करता आले नाही. यंदा या शेतकऱ्यांनी मोठी रक्कम मोजून कांदा बियाणे खरेदी केले. मात्र, या आठवड्यात ज्यांनी रोपांसाठी बियाणे पेरले त्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.