पुणे शहरात शिक्षण, नोकरी किंवा विविध कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि बाहेरगावाहून आलेले नागरिक राहतात. त्यांच्यासाठी कमी खर्चात पौष्टिक आणि पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने 2012 साली सद्गुरू शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने 20 रुपयांत पोटभर जेवण हा उपक्रम सुरू करण्यात आला. गेल्या 14 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून अनेक गरजू लोकांसाठी तो मोठा आधार ठरला आहे.
advertisement
घरात उरलेला शिळा भात फेकून देताय? झटपट बनवा पनीर फ्राईड राइस, रेसिपीचा Video
कोरोना काळातही हा उपक्रम खंड न पडता सुरू ठेवण्यात आला होता. त्या काळात अनेक नागरिक अडचणीत असताना सेवा मंडळाने हे जेवण पूर्णपणे मोफत दिले होते. आता सध्याच्या जागतिक तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी या उपक्रमात खंड पडू दिला जाणार नाही, असे सेवा मंडळाने स्पष्ट केले आहे.
सेवा मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र आबा शिळीमकर यांनी सांगितले की, जर गॅसचा तुटवडा निर्माण झाला, तर आम्ही चुलीवर स्वयंपाक करूनही हा उपक्रम सुरू ठेवू. विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांचे नातेवाईक, छोटे व्यावसायिक किंवा बाहेरगावाहून आलेले नागरिक यांना उपाशी राहावे लागू नये, हा आमचा उद्देश आहे.
या उपक्रमात दररोज चपाती, भाजी आणि भात असे साधे पण पौष्टिक जेवण दिले जाते. तसेच शंकर महाराजांची विशेष खिचडीही नागरिकांना दिली जाते. दर सोमवारी आणि गुरुवारी गोड दिले जाते, ज्याचा अनेक शेकडो भाविक आणि विद्यार्थ्यांना लाभ होतो.
शंकर महाराज मठात दर्शनासाठी येणारे भाविक, विद्यार्थी तसेच गरजू नागरिक येथे येऊन अल्प दरात पोटभर जेवण घेतात. सध्याच्या अनिश्चित परिस्थितीतही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार सेवा मंडळाने व्यक्त केला असून, गरजूंना आधार देण्याची ही सेवा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.





