नवीन पर्याय काय?
गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झाले होते. काहींच्या बाबतीत कागदपत्रांतील त्रुटी, चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदणी हे कारण ठरले होते. तर काही नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज “व्हेरिफिकेशन” टप्प्यावर अडकले होते. आता या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नव्या “Update Missing Information” या सुविधेची अंमलबजावणी केली आहे.
advertisement
या नव्या पर्यायाच्या माध्यमातून शेतकरी आपली चुकीची वैयक्तिक माहिती, जमिनीचे तपशील, आधार क्रमांक किंवा बँक खाते माहिती दुरुस्त करू शकतील. तसेच, जर कोणत्याही शेतकऱ्याची नोंदणी “Rejected” (रिजेक्ट) झाली असेल किंवा हप्ते बंद झाले असतील, तर आवश्यक कागदपत्रे पुन्हा अपलोड करून अर्ज पुन्हा सक्रिय करता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांकाच्या सहाय्याने पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल.
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांना आधी हप्ते मिळत होते पण काही कारणास्तव ते थांबले आहेत, त्यांनी या नव्या पर्यायाचा तातडीने वापर करावा. उदाहरणार्थ, आधार कार्डवरील चुकीचा क्रमांक, जमिनीच्या फेरफार नोंदी, बँक खात्याचा तपशील किंवा ई-केवायसीची अपूर्णता या कारणांमुळे हप्ते थांबले असतील, तर शेतकरी आता ती सर्व माहिती दुरुस्त करून पुन्हा लाभ घेऊ शकतात.
‘Update Missing Information’ या पर्यायातून कागदपत्रे अपलोड करण्याची सोयही करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आवश्यक असल्यास जमिनीचा फेरफार दस्तऐवज, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुकची प्रत पोर्टलवर थेट अपलोड करता येईल. सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर ती संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर पुढील हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
अन्यथा हप्ते थांबणार
कृषी विभागाने राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आपली माहिती त्वरित तपासण्याचं आणि आवश्यक सुधारणा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण चुकीची किंवा अपूर्ण माहिती राहिल्यास पुढील हप्ते थांबू शकतात.
एकूणच, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत थांबलेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी आणि नव्या शेतकऱ्यांची नोंदणी सक्रिय करण्यासाठी “Update Missing Information” हा पर्याय मोठा दिलासा ठरणार आहे.