पापरी गावातील शेतकरी तरुण अतुल फराटे यांनी पूर्वा व्हाईट या जातीच्या शेवंती फुलांची लागवड केली आहे. एका एकरात 12 हजार पूर्वा व्हाईट या शेवंती फुलांची लागवड केली आहे. साताऱ्यातून 3 रुपये प्रमाणे एक रोप असे मिळून 12 हजार रोपांची खरेदी अतुल यांनी केली आहे. रोप, मल्चिंग पेपर आदी खर्च मिळून एक ते सव्वा लाख रुपयेपर्यंत खर्च आला आहे.
advertisement
नोकरीचा नाद सोडला अन् लावलं पिवळं सोनं, सांगलीचा युवा शेतकरी 4 एकरात मालामाल!
सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्वा व्हाईट शेवंतीच्या फुलाचे दर कमी झाले आहेत. सोलापूर आणि मुंबईच्या मार्केटमध्ये 100 रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहे. पावसाळ्या अगोदर या फुलाचे दर 200 रुपये किलो प्रमाणे मिळत होते. तर अडीच महिन्यात फुल विकून तरुण शेतकरी अतुल फराटे यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे.
पूर्वा व्हाईट शेवंतीच्या फुलाची एकदा लागवड केल्यास या फुलांची तोडणी चार महिन्यांपर्यंत चालते. आठवड्यातून पाच दिवसांना एक तोडा या फुलांचा केला जातो. सध्या या फुलाची विक्री सोलापूर आणि मुंबईच्या मार्केटमध्ये केली जात आहे.
पूर्वा व्हाईट या शेवंती फुलाचा चांगला भर सुरू झाल्यास एकरी एक टनाचा तोडा होऊ शकतो. लागवडीचा सर्व खर्च वजा करून या पूर्वा व्हाईट शेवंती फुलाच्या विक्रीतून तरुण शेतकरी अतुल फराटे यांना 2 ते 3 लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती दिली. तरुणांनी चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली शेती केल्यास नक्कीच फायदा मिळेल, असा सल्ला तरुण शेतकरी अतुल फराटे यांनी दिला आहे.