पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका लातूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांना बसला आहे. या २८ जिल्ह्यांमधील १४२ तालुके आणि ८३७ गावे बाधित झाली असून, त्यामध्ये मोठे ४८११, लहान ३८६७ असे एकूण ८६७८ पशुधन मृत झाले आहे. तसेच, १ लाख ६४ हजार ८२४ कोंबड्याही दगावल्या आहेत.
राज्य शासनाने यासाठी नुकसान भरपाईचे निकष निश्चित केले आहेत आणि त्यानुसार प्रत्येक मृत पशुधनाला शासनाकडून ठराविक आर्थिक मदत दिली जाणार आहे.
advertisement
नुकसान भरपाईचे निकष
म्हैस/गाय: ३७,५०० प्रति पशुधन
बैल/अश्व: ३२,००० प्रति पशुधन
वासरे, गाढव, शिंगरू, खेचरे, कालवडी: २०,००० प्रति पशुधन
शेळी, मेंढी, वराह: ४,००० रु प्रति पशुधन
कोंबडी: १०० रु प्रति कोंबडी (१०,००० पर्यंत प्रति कुटुंब मर्यादा)
शासनाच्या निर्णयानुसार, अतिवृष्टिबाधित भागांतील मृत पशुधनाच्या भरपाईसाठी कोणतीही संख्येची मर्यादा राहणार नाही. "मृत झालेल्या सर्व पशुधनाला शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे," असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सांगितले.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये अजूनही काही ठिकाणी आजारी आणि जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाने पशुधनांचे आरोग्य टिकवण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली आहे. या अंतर्गत आतापर्यंत ३२ हजार गोवंशीय, ३१ लाख २५ हजार म्हैस वर्गीय आणि ७६ लाख ९९ हजार शेळ्या-मेंढ्या यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.