मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पोहोचली असून, आता पुढील टप्प्यातील निधी वाटप सुरू होणार आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि हंगामी तयारीसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पूरग्रस्तांसाठी ३१ हजार कोटींचे पॅकेज
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच ३१ हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजचा एक भाग म्हणून सध्याची ११ हजार कोटी रुपयांची मदत दिली जात आहे. फडणवीस म्हणाले की, “आम्ही ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या देखील लवकर सोडवण्यात येतील.”
advertisement
या मदतीमुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामाची पेरणी, खत आणि बियाणे खरेदी तसेच इतर शेतीसंबंधी खर्च भागवण्यासाठी दिलासा मिळणार आहे.
Agristack नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, Agristack पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. सरकारकडे त्यांची माहिती आधीपासून उपलब्ध असल्याने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. ही व्यवस्था प्रक्रियेला गती देणार असून, शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची किंवा सरकारी कार्यालयांची धावपळ करावी लागणार नाही.
Agristack या डिजिटल उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जमीन, पिकांचा प्रकार,नुकसानाचे प्रमाण आणि बँक तपशील एकाच ठिकाणी नोंदवली जाते. त्यामुळे मदत वितरण अधिक पारदर्शक आणि वेगवान होत आहे.
मदतीचे पारदर्शक वितरण
मुख्यमंत्री म्हणाले, “शासनाने मदत पारदर्शक पद्धतीने वितरित करण्याचे ठरवले आहे. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय पात्र शेतकऱ्यांनाच थेट आर्थिक मदत मिळेल. जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय अहवालांच्या आधारे निधीचे वाटप सुरू झाले आहे.”
शेतकऱ्यांसाठी दिलासा
राज्यातील अनेक भागांत गेल्या काही महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पन्न कोसळले, तर काहींच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेला हा आर्थिक आधार पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल.
