शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं की थांबायचं?
उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुढील वर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने जूनचा शब्द दिला, पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी आहे ते कर्जाचे हप्ते भरायचे की नाही? येत्या रब्बी हंगामासाठी जे नवीन कर्ज मिळणार आहे, त्याचे हप्ते काय करायचे?” असा सवाल उपस्थित केला.
advertisement
२ दिवसांत महाराष्ट्राचा दौरा कसा शक्य?
ठाकरे यांनी केंद्राच्या पाहणी पथकाच्या दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, “केंद्राचे पथक फक्त दोन-तीन दिवसांचा दौरा करणार आहे. एवढ्या कमी वेळात ते संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नुकसानीचा अंदाज कसा घेणार? हे फक्त औपचारिकतेसाठी आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले होते. पण फडणवीस सरकारने अद्याप केंद्राला प्रस्ताव पाठवलेलाच नाही. हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.”
“जमीन वाहून गेली, मग कर्ज कसे मिळणार?”
उद्धव ठाकरे यांनी पुढील रब्बी हंगामासाठी कर्ज वितरणावर देखील प्रश्न उपस्थित केला. ''अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे, त्यांचं पीक संपलं आहे. अशा वेळी त्यांना बँक कर्ज कसे देणार? आणि कर्ज दिलं तरी त्याचे हप्ते ते कसे भरतील?”
कर्जमाफी केली तर बँकांना फायदा?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
“मुख्यमंत्री म्हणतात की, कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल, म्हणून ती देत नाही. पण जूनमध्येच कर्जमाफी केली तर तेव्हा बँकांना फायदा होणार नाही का? हे कोणते अर्थशास्त्र आहे?” असाही सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
