या हंगामात मटार, फ्लॉवर, कोबी, गाजर, बीट, पालक, मेथी आणि कांदा यांसारख्या भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकांना थंड वातावरणाची गरज असते आणि त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. विशेष म्हणजे, हिवाळ्यात कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादनाचे प्रमाण जास्त मिळते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना मिळतो.
advertisement
शेतकरी संदीप गवळी सांगतात, गेल्या दोन वर्षांपासून मी मटार आणि फ्लॉवरची लागवड करतोय. मटार हे दोन महिन्यांत तयार होणारे पीक असून बाजारात त्याची कायम मागणी असते. फ्लॉवरचे दर थंडीत चांगले मिळतात, त्यामुळे दोन्ही पिकांमधून हंगामात चांगला नफा मिळतो. त्यांच्या अनुभवावरून स्पष्ट होते की कमी जोखमीच्या या पिकांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढत आहे.
हिवाळ्यातील मुळभाज्यांनाही मोठी मागणी असते. गाजर, बीट आणि मुळा यांसारख्या पिकांपासून थेट विक्रीसोबतच प्रोसेसिंग उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून घेतलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठेत जास्त भाव मिळतो. त्यामुळे आता अनेक तरुण शेतकरी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य सिंचन व्यवस्थापन, मल्चिंग आणि बाजारपेठेचा अभ्यास यावर लक्ष केंद्रित केल्यास हिवाळ्यातील भाजीपाला शेती अत्यंत फायदेशीर ठरू शकते. थंड हवामान, चांगले उत्पादन आणि वाढती बाजारपेठ या तिन्हींचा संगम झाल्यामुळे हिवाळ्यातील शेती शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. आगामी काही आठवड्यांत मराठवाड्यातील बाजारपेठा या ताज्या भाज्यांनी गजबजणार आहेत, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.





