अनेक शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही दोन प्रमुख पिके प्रामुख्याने घेतात. वेगवेगळ्या कारणांनी मुग आणि उडीद पिकाचे क्षेत्र खालावत चालले आहे. परंतु ही दोन्ही पिके जमिनीला अतिशय पोषक अशी आहेत. तसेच जमिनीतील नत्राचा पुरवठा वाढवणारी ही पिके आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पीक चांगले येण्यासाठी ही पिके अतिशय उत्तम आहेत.
Turmeric Crop: तणामुळे हळद उत्पादनाला मोठा फटका, कसं कराल नियंत्रण?, Video
advertisement
सुधारित जाती
मराठवाड्यासाठी अतिशय उत्तम अशी जात म्हणजे बीएम 2003-2, ही जात बदनापूर कृषी विज्ञान केंद्राने संशोधित केलेली आहे. या वाणाच्या शेंगा एकत्रित पक्व होतात. तसेच शेंगात दाण्याचे प्रमाण देखील चांगले असते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली फुले चेतक ही जात देखील अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर फुले वैभव ही देखील जात अतिशय उत्तम आहे. उडीद पिकाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फारशा सुधारित जाती उपलब्ध नाहीत.
परंतु अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड नावाने विकसित केलेली जात अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर ए के यु 10-1 ही जात देखील उडीद पिकासाठी अतिशय उत्तम आहे. त्याचबरोबर इतर खाजगी कंपन्यांनी विकसित केलेली काही चांगली वाणे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची पेरणी देखील शेतकरी करू शकतात.
मुग आणि उडदाची पेरणी पावसाच्या पहिल्या पाण्यावर किंवा 15 जूनच्या आधी करावी. पेरणी करताना बीज प्रक्रिया अवश्य करावी. ट्रॅक्टरद्वारे किंवा तीफनीच्या साह्याने पेरणी करावी. दोन ओळींतील अंतर 30 सेमी तर दोन झाडांतील अंतर 10 ते 12 सेमी एवढे राहील याची काळजी घ्यावी. पेरणी करताना शेतामध्ये पुरेशी ओल असावी याची काळजी घ्यावी. तसेच तीन ते चार सेंटीमीटर खोलीवर मुग किंवा उडदाची पेरणी करावी. एकरी पाच ते सहा किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे श्रीकृष्ण सोनूने यांनी लोकल 18 बरोबर बोलताना सांगितले.





