ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, मंगळ हा ऊर्जा, आक्रमकता आणि धाडसाचा ग्रह मानला जातो, तर राहू हा भ्रम, अचानक घडामोडी आणि अनपेक्षित घटनांचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत येतात, तेव्हा नकारात्मक ऊर्जा अधिक तीव्र होते. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार असून, तेथे आधीपासूनच राहू उपस्थित आहे. या संयोगामुळे समाजात अस्थिरता, वैयक्तिक आयुष्यात तणाव आणि अनेकांसाठी अनपेक्षित अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरी या योगाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडणार असला, तरी तीन राशींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
सिंह
सिंह राशीसाठी हा अंगारक योग विशेषतः आव्हानात्मक ठरू शकतो. हा योग सिंह राशीच्या आठव्या घरात तयार होत असल्याने अचानक अडचणी, आरोग्यविषयक समस्या किंवा अपघाताची शक्यता वाढते. या काळात हृदयविकार, रक्तदाब किंवा प्रजननाशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणताही धोका पत्करणे टाळावे, वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. नवीन व्यवसाय, गुंतवणूक किंवा मोठे निर्णय पुढे ढकललेले बरे. कौटुंबिक जीवनातही तणाव निर्माण होऊ शकतो. पती-पत्नीमधील संवादात गैरसमज टाळण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक ठरेल.
कन्या
कन्या राशीसाठी मंगळ-राहूची युती आरोग्य आणि संघर्ष वाढवणारी ठरू शकते. हा योग सहाव्या घराशी संबंधित प्रभाव देत असल्याने आजारपण, मानसिक तणाव आणि शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धा किंवा वाद निर्माण होऊ शकतात. कायदेशीर प्रकरणे किंवा वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. लपलेले विरोधक सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. रक्ताशी संबंधित आजार, जखमा किंवा शस्त्रक्रियेची शक्यता असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या थोडा कठीण ठरू शकतो. अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. पैशांच्या व्यवहारात अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. वाद, गैरसमज किंवा कायदेशीर गुंतागुंत उद्भवू शकते. कौटुंबिक वातावरणात, विशेषतः भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी ताण, जबाबदाऱ्यांचा भार किंवा वरिष्ठांशी मतभेद सहन करावे लागू शकतात. कोणतेही काम घाईघाईने न करता शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
