2026 मधील पहिले चंद्रग्रहण कुठे दिसणार?
3 मार्च 2026 रोजी होणारे हे वर्षातील पहिले ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. ग्रस्तोदित म्हणजे चंद्र उगवतानाच तो ग्रहणग्रस्त अवस्थेत दिसतो. हे ग्रहण भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप व आफ्रिकेतील काही भागांमध्ये दृश्यमान होण्याची शक्यता आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात चंद्र उगवतानाच ग्रहणाचा काही अंश पाहायला मिळू शकतो. महाराष्ट्रात सायंकाळी साधारणपणे 6.30 ते 6.45 दरम्यान चंद्रोदय होईल आणि त्यावेळी तो ग्रहणग्रस्त अवस्थेत दिसू शकतो. ग्रहणाचा शेवट रात्री अंदाजे 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. स्थानानुसार वेळेत थोडाफार फरक संभवतो.
advertisement
होलिका दहन कधी करावे?
होलिका दहनाबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे की पौर्णिमा दोन दिवस असल्याने नेमके कधी दहन करावे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रदोषकाळ महत्त्वाचा मानला जातो आणि तो 2 मार्चपासून सुरू होत असल्याने 2 मार्चच्या रात्री होलिका दहन करणे योग्य ठरेल. 3 मार्च रोजी चंद्रग्रहण असल्यामुळे त्या दिवशी होलिका दहन टाळणे हितावह मानले जाते.
ग्रहणकाळात काय करावे?
ग्रहणकाळ धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो. या काळात मंत्रजप, ध्यान, स्तोत्रपठण किंवा आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करणे शुभ मानले जाते. अनेकजण “ॐ नमो भगवते वासुदेवाय” किंवा इतर मंत्रांचा जप करतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी शिजवलेल्या अन्नात तुळशीपत्र ठेवण्याची प्रथा आहे. शक्य असल्यास ग्रहणकाळात शांतपणे ध्यानधारणा करावी आणि मन एकाग्र ठेवावे.
ग्रहणकाळात काय करू नये?
ग्रहणकाळात काही गोष्टी टाळण्याची परंपरा आहे. या वेळेत अन्न सेवन करणे, स्वयंपाक करणे किंवा नवीन कामांची सुरुवात करणे टाळावे असे मानले जाते. शिवणकाम, केस कापणे, नखे कापणे यांसारख्या कृतीही टाळाव्यात. लहान बाळे, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी धारदार वस्तूंचा वापर टाळावा, अनावश्यक बाहेर जाणे टाळावे आणि विश्रांती घ्यावी, असे सांगितले जाते. बाळ आणि वृद्धांनी देखील आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षित वातावरणात राहावे. तथापि, हे सर्व आचरण श्रद्धा आणि परंपरेनुसार आहे; वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे.
ग्रहण संपल्यानंतर काय करावे?
ग्रहण समाप्तीनंतर शुद्धीकरणाला महत्त्व दिले जाते. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करणे शुभ मानले जाते. त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवतांची पूजा करावी, देवांच्या चरणी नमस्कार करावा आणि तुळशीपत्र असलेले पाणी प्राशन करावे. ग्रहणापूर्वी तयार केलेले अन्न त्याग करून ताजे अन्न तयार करावे, अशीही प्रथा आहे. काही जण या दिवशी दानधर्म करून पुण्यप्राप्ती करण्याचाही संकल्प करतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





