गुढीपाडवा 2026 तारीख आणि शुभ मुहूर्त - हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो. यावर्षी हा सण 19 मार्च 2026, गुरुवारी साजरा होईल. दृक पंचांगानुसार, चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सुरू होईल. तर, या तिथीची समाप्ती 20 मार्च 2026 रोजी सकाळी 4 वाजून 52 मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी 19 मार्च रोजीच गुढीपाडवा साजरा केला जाईल आणि याच दिवशी गुढी उभारली जाईल.
advertisement
कडुलिंब का खातात?
गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंब खाण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रसादात कडुलिंबाची पाने आणि साखर (किंवा गूळ) यांचे मिश्रण खाल्ले जाते. कडुलिंबाचा कडूपणा आणि साखरेचा गोडवा असं शिकवतो की जीवन सुख-दुःखाचे मिश्रण आहे, ज्याचा आपण समभावाने स्वीकार केला पाहिजे. आपल्याकडे महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी मुख्यत्वे बनवली जाते. यासोबतच पुरण पोळी सोबत श्रीखंड आणि पुरी-भाजीचा नैवेद्यही अर्पण केला जातो.
शनी अस्ताला गेला की या राशींचे हाल! 13 मार्चपासून पुढे 35 दिवस अलर्ट मोडवर राहा, अन्यथा..
गुढीपाडव्याचे पौराणिक महत्त्व - गुढीपाडव्याबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. असे मानले जाते की, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना करण्यास सुरुवात केली होती. म्हणूनच या दिवसाला ब्रह्मांडाचा वाढदिवस म्हणूनही पाहिले जाते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या विजयगाथा आणि शालिवाहन शकाची सुरुवात यांच्याशीही या दिवसाला जोडलेले आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. श्रीराम लंका जिंकून अयोध्येत परत आल्याचा आनंदोत्सव म्हणूनही गुढ्या उभारण्याची परंपरा आहे.
वाटतंय तितकं सोपं नाही! शनी-मंगळ-बुधाचा अस्त म्हणजे या 3 राशींवर खराब वेळ
हा उत्सव कसा साजरा करतात?
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सूर्योदयाच्या वेळी स्नान उरकून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुढीकाठी सजवतात. एका बांबूच्या काठीला रेशमी कापड, कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी आणि उलटा तांब्याचा कलश लावून गुढी उभारली जाते. घराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते आणि नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात केली जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
