मुंबई : ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या छाया ग्रहांना विशेष महत्त्व दिले जाते. केवळ त्यांचे नाव घेतले तरी अनेकांच्या मनात भीती किंवा कुतूहल निर्माण होते, कारण केतू हा अचानक घडणाऱ्या घटना, अनपेक्षित बदल आणि भूतकाळातील कर्मांचा प्रतिनिधी मानला जातो. केतू व्यक्तीला भौतिक सुखांपासून थोडे दूर नेत आध्यात्मिकतेकडे वळवतो, त्याग, वैराग्य आणि मोक्षाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे केतूचे राशी परिवर्तन जितके महत्त्वाचे असते, तितकेच त्याचे नक्षत्रातील स्थान आणि त्यातील बदलही ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावी मानले जातात.
advertisement
नवीन वर्ष 2026 सुरू होताच केतूचे पहिले महत्त्वाचे संक्रमण जानेवारी महिन्यात घडणार आहे. या संक्रमणामुळे अनेकांच्या आयुष्यात सूक्ष्म पण परिणामकारक बदल दिसून येण्याची शक्यता आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, या काळात अनावश्यक खर्चात घट, नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि अचानक आर्थिक लाभाचे योग निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे, हा कालावधी तीन राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.
पंचांगानुसार, 25 जानेवारी 2026 रोजी केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रातील द्वितीय चरणातून पहिल्या चरणात प्रवेश करेल. हा बदल मार्च 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे. ज्योतिषी हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, या संक्रमणामुळे खर्चावर नियंत्रण येईल, भावनिक दुरावा कमी होईल आणि आर्थिक संधी अचानक समोर येऊ शकतात. काही लोकांसाठी हा काळ लॉटरीसारखा लाभ देणारा ठरू शकतो. या काळात विशेषतः सिंह, वृषभ आणि वृश्चिक या तीन राशींना केतूचा अनुकूल प्रभाव जाणवेल.
सिंह : राशीच्या लोकांसाठी केतूचे हे संक्रमण भाग्यवर्धक ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात अचानक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे असून, गुंतवणूक किंवा अनपेक्षित स्रोतांतून नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची स्वतंत्र ओळख निर्माण होईल आणि वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळेल. खर्चावर नियंत्रण राहिल्यामुळे आर्थिक स्थिती अधिक भक्कम बनेल. याच काळात प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे, जी पुढील काळात फायदेशीर ठरू शकते.
वृषभ : राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण आर्थिक चमत्कार घडवू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग अचानक खुले होऊ शकतात. कौटुंबिक मालमत्ता, वारसा किंवा जुने गुंतवणूक निर्णय यांमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. नशीब साथ देईल आणि जोखीम पत्करली तरी यश मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत असून, कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील.
वृश्चिक : राशीच्या लोकांसाठी केतूचे हे संक्रमण शुभ संकेत घेऊन येणारे ठरेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित यश मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची दारे खुली होतील. समाजात मान, प्रतिष्ठा आणि विश्वास वाढेल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळण्याची शक्यता असून, आर्थिक ओझे हलके होईल. या काळात भौतिक सुखांसोबत आध्यात्मिक जाणीवही वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातील, ज्या दीर्घकाळात लाभदायक ठरतील. तसेच परदेशातून किंवा दूरच्या ठिकाणाहून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ मिळण्याचे योगही दिसून येतात.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
