BMC Election: ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आली अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election : ठाकरे बंधूंच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून दुसरीकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. ठाकरे गट, मनसेसोबत राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे
मुंबई: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्यात महत्त्वाची महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असून जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट, मनसेसोबत राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून दुसरीकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक एकत्रितपणे लढण्याबाबत शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळपास एकमत झाले आहे. या आघाडीत डावे पक्षही सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
ठाकरे गट-मनसे नेत्यांमध्ये जागा वाटपाचं काय ठरलं?
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक एकत्रितपणे लढण्याबाबत शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळपास एकमत झाले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये तूर्तास जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चर्चेनुसार ठाकरे गट १२० ते १२५ प्रभागांमध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मनसेला ७५ ते ८० तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० ते २७ प्रभाग सोडले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने या तीन पक्षांची आघाडी ठरल्याचे मानले जात आहे.
advertisement
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. हे प्रभाग कायम ठेवत आणखी ३६ ते ४० नव्या प्रभागांवर ठाकरे गटाचे दावा केला आहे. आघाडीत प्रभाग वाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी किमान १२० ते १२५ जागा लढवण्यावर पक्ष ठाम आहे. कोणते प्रभाग कोणाला द्यायचे यावर मनसे आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
advertisement
मनसेच्या वाट्याला किती जागा येणार?
मनसेला ७५ ते ८० प्रभाग मिळण्याची शक्यता असून, २०१७ मध्ये निवडून आलेल्या सात नगरसेवकांच्या प्रभागांसह मागील निवडणुकीत ठाकरे गटाने जिंकलेले काही प्रभाग मनसे मागण्याची शक्यता आहे. माहीम, शिवडी, वरळी, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी जागा वाटप करताना तणातणी होण्याची शक्यता आहे. मात्र महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याने ठाकरे गटाला काहीसं नमतं घेऊन काही प्रभाग सोडावे लागणार आहेत.
advertisement
राष्ट्रवादीच्या वाटेला किती जागा?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यामुळे शरद पवार गटाचा मुंबईत तुलनेने कमी प्रभाव आहे. तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीला २० ते २७ प्रभाग मिळू शकतात. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागांसह घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी, मालाड, भांडुप, कांजूरमार्ग, अणुशक्ती नगर, भायखळा आदी भागांतील आणखी १० ते १५ प्रभागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. मात्र, पक्षातील फुटीचा परिणामही झाला आहे.
advertisement
डावी आघाडीही ठाकरेंसोबत?
दरम्यान, ठाकरे-मनसे-राष्ट्रवादीसोबत डावी आघाडीदेखील युती करण्याची शक्यता आहे. डाव्यांचा मुंबईतील काही ठिकाणी प्रभाव आहे. त्यामुळे आपल्या प्रभावातील जागा डाव्यांकडून मागितल्या जाण्याची शक्यता आहे. डाव्या आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे काही जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डाव्यांना सोबत घेतल्यास अटीतटीच्या निवडणुकीत काही जागांवर मतविभाजन टाळले जाण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 8:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आली अपडेट









