Pune MHADA : पुणेकर लक्ष द्या! म्हाडाच्या घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; नवीन तारीख काय?
Last Updated:
Pune Mhada Houses Lottery : पुणे म्हाडा मंडळाच्या घरांसाठीची सोडत तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. सुमारे दोन लाख 15 हजार अर्जदार नवीन तारखेची वाट पाहत असून लवकरच तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुणे : पुणे म्हाडा प्रकल्पात घर घेणाऱ्यांनी अर्ज केला होता मात्र बहुप्रतीक्षित सोडत तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. अर्जदारांची उत्सुकता आणि निराशा वाढली असून पुढील नेमकी तारीख अजूनही निश्चित झालेली नाही.
घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर पडली
पुणे म्हाडाच्या या 4,186 घरांसाठी 16 किंवा 17 डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येईल,असे पुणे मंडळाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र संगणकीय प्रणालीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रद्द करावी लागली.त्यामुळे घरांच्या आशेवर असलेल्या लाखो नागरिकांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
नवीन तारीख कोणती असेल?
या योजनेसाठी सुमारे दोन लाख 15 हजार नागरिकांनी अर्ज केले असून सर्वजण सोडतीच्या तारखेची वाट पाहत आहेत. आता येत्या एक ते दोन दिवसांत सोडतीची नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी 6 वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
advertisement
पुणे मंडळाच्या घरांसाठी 11 सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या सोडतीअंतर्गत एकूण 4,186 घरे उपलब्ध असून त्यामध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 20 टक्के म्हणजेच 3,222 घरे तर एकात्मिक गृहनिर्माण योजनेतील 15 टक्के म्हणजेच 864 घरांचा समावेश आहे.
सोडतपूर्व प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संगणकीय प्रणालीतील अडचणींमुळे दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. सुरुवातीला ही मुदत 21 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 11 डिसेंबरपर्यंत करण्यात आली. मात्र त्यानंतरही सोडत होऊ शकली नाही. पुढे 16 किंवा 17 डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते; मात्र तीही आता होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल दोन लाख 15 हजार अर्जांची छाननी करून प्रारूप यादी अंतिम करण्यात विलंब झाला. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असली तरी प्रारूप यादीवरील हरकती आणि सुनावणीनंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळेच पुणे म्हाडा मंडळाला सोडत पुढे ढकलावी लागली आहे. सध्या तरी सोडत नेमकी कधी काढली जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune MHADA : पुणेकर लक्ष द्या! म्हाडाच्या घरांसाठीची सोडत पुन्हा लांबणीवर; नवीन तारीख काय?









