बजाज कंपनीच्या भारतातून निर्यात होणाऱ्या बाइक्सच्या यादीत बॉक्सर पहिल्या क्रमांकावर आहे. बजाज ऑटो भारतातून बॉक्सर, पल्सर, प्लॅटिना, सीटी, डिस्कव्हर, डोमिनार आणि अॅव्हेंजर या बाइक्सची निर्यात करते. कंपनीच्या या बाइक्सची आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियासह अनेक देशांमध्ये विक्री होते. आकडेवारीवर नजर टाकली तर बजाज बॉक्सर ही त्यापैकी सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे.
advertisement
बॉक्सरची धूम
आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात अर्थात नोव्हेंबर 2023मध्ये बजाज कंपनीनं बॉक्सरची 63,936 युनिट्स निर्यात केली. गेल्या महिन्यात सिकी एक्स्पोर्टमध्ये जवळपास वीस टक्के घट झाली असली तरी ही सर्वाधिक निर्यात होणारी बाइक ठरली. याशिवाय पल्सर आणि सीटीची अनुक्रमे 31,392 आणि 14,112 युनिट्स निर्यात झाली. बजाजने भारतातून डिस्कव्हरच्या 7252 युनिट्सची निर्यात केली तर प्लॅटिनाची संख्या 2673 युनिट्स इतकी होती. कंपनीने सर्वांत कमी अॅव्हेंजरची निर्यात केली. ती फक्त 13 युनिट्स होती. नोव्हेंबर महिन्यात कंपनीने 1,21,691 बाइक्सची निर्यात केली.
बॉक्सरच्या अनेक व्हॅरिएंट्सची होतेय विक्री
बजाज कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात बॉक्सरच्या तीन व्हॅरिएंट्सची विक्री करत आहे. यात 110cc,125cc आणि 150cc मॉडेल्सचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक पसंती 110cc मॉडेलला आहे. या मॉडेलची 45,784 युनिट्स विकली गेली आहेत. त्याच वेळी 125cc मॉडेलच्या 7604 युनिट्सची विक्री झाली आहे. बॉक्सर 150cc मॉडेललादेखील जोरदार मागणी आहे. गेल्या महिन्यात या व्हॅरिएंटची 10,548 युनिट्स विकली गेली आहेत. एकूण आकडेवारी पाहता, भारतात जरी बजाज बॉक्सर काहीशी विस्मरणात गेली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात या बाइकची क्रेझ कायम असल्याचं दिसतं.