मारुती स्विफ्ट ही हॅचबॅक प्रकारातली ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली कार आहे. ग्राहकांची बदलती पिढी, आवडीनिवडी आणि नवनव्या फीचर्सची असलेली आवड यांना पुरे पडण्यासाठी मारुतीकडून स्विफ्टचा कायापालट करण्यात येत आहे. अत्याधुनिक रूपातली स्विफ्ट फेब्रुवारी महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट म्हणून बाजारात दाखल होणार अशी चर्चा आहे. रस्त्यावर टेस्ट ड्राइव्ह करताना ही कार अनेकदा दिसून आली आहे. स्विफ्टचा फक्त लूक बदलणार नसून तिचं इंजिनसुद्धा अधिक कार्यक्षम करण्यात आल्याची माहिती आहे. स्विफ्ट आता ग्राहकांना हायब्रिड प्रकारात मिळणार असून, त्यामुळे तिचं मायलेजसुद्धा एखाद्या सीएनजी कारच्या तोडीस तोड मिळेल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. 1.2 लिटर नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन हे नव्या स्विफ्टचं वैशिष्ट्य असेल. कदाचित सीएनजी प्रकारातही ही कार आणली जाऊ शकते. दुसरं हायब्रिड इंजिन 30 किलोमीटरपर्यंत मायलेज देईल अशी चर्चा आहे.
advertisement
नवीन पिढीतल्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मारुतीकडून कारच्या डिझाइन्सवर खूप काम केलं जाताना दिसतंय. नवीन स्विफ्टही क्रॉसओव्हर डिझाइनमध्ये येईल. नवीन बंपर, ग्रिल, एलईडी टेललॅंप असे फीचर्स गाडीचा लूक आणखी स्टायलिश करतील अशी शक्यता आहे. कारच्या इंटीरिअरमध्येही आकर्षक बदल करण्यात आले असून, ड्युएल टोन कलर थीमही बघायला मिळू शकते. या स्विफ्टमध्ये सहा एअरबॅग्ज असतील. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही तडजोड ठेवण्यात आलेली नाही, हे स्पष्ट आहे. पार्किंग कॅमेरा, इन्फोटेनमेंट सिस्टिम, क्लायमेट कंट्रोल एसी, ॲपल कार प्ले अशी फीचर्स या हॅचबॅक कारला कुठल्याही प्रीमियम कारच्या बरोबरीला नेऊन ठेवतील यात शंका नाही. मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्टच्या किमतीबाबत मारुतीकडून कुठलाही खुलासा करण्यात आला नसला, तरी सात ते 14 लाखांच्या दरम्यान ती उपलब्ध होईल असा अंदाज आहे.