पिंपरी चिंचवड : आज 5 नोव्हेंबर, मराठी रंगभूमी दिवस आहे. रंगभूमीवर सादर होणाऱ्या कलांचं आपल्या जीवनातील महत्त्व लोकांना समजावं, या उद्देशाने रंगभूमी दिन साजरा केला जातो. मराठी रंगभूमीला जवळजवळ 170 वर्षांच्या परंपरेचं बळ लाभलं आहे. 1843 साली सांगलीत विष्णुदास भावे यांनी केलेल्या 'सीता स्वयंवर' या नाटकानं मराठी रंगभूमीचा जन्म झाला. त्या पहिल्या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. यानंतर अनेक लोककला प्रसिद्ध झाल्या. मात्र, आता राजाश्रय आणि त्याबरोबर लोकाश्रय देखील मिळत नसल्याने महाराष्ट्रातील अनेक लोककला आणि त्या सादर करणारे लोककलावंत काळाच्या पडद्याआड जातायत.
advertisement
पिंपरी चिंचवडमधील लावणी सम्राट म्हणून फिरोज भाई यांची ओळख आहे. मिळेल तो कार्यक्रम घेत आपल्या कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्याप्रमाणेच शहरातील वासुदेव, बँड पथक आणि गोंधळी यांसारखे कलाकार देखील आपल्या कलेचा वारसा पुढे नेतायत. मात्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणातील लोककलावंतांसाठी असलेली एकही योजना आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याची खंत व्यक्त करत आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आता तरी सरकारने विचार करावा, अशी मागणी या कलाकारांनी केली आहे.
लावणी सम्राट फिरोज भाई सांगतात की, गेली 40 वर्षे मी नृत्य क्षेत्रात कार्यरत आहे. राजा गोसावी आपण नाव ऐकलं असेल, ह्यांच्याबरोबर मी बऱ्याच नाटकात काम केलं. यामध्ये माझा मोठा रोल होता. यामुळे मला लावण्याचे अनेक कार्यक्रम आले. सुरेखा बाईंनंतर जेवढ्या कार्यक्रमांना कोरिओग्राफी केली तो मी पहिला पुण्यातील होतो. अनेक शोमध्ये मी काम केलं.
मला पुरस्कार मिळाले आहेत. पण त्या पुरस्काराबद्दल जे काही मिळायला पाहिजे ते आम्हा कलावंतांना मिळत नाही. असं रस्त्यावर किती दिवस नाचायचे. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची म्हणत मी काम करेल. कोणाचे लग्न असेल, बारसे असू दे, आम्हाला किंमत नाही राहिली, असं फिरोज भाई सांगतात.





