चंद्रपूर : रशियामध्ये 22 वा आंतरराष्ट्रीय सिनेमॅटिक पदार्पण महोत्सव "Spirit of Fire" चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी विदर्भाच्या सुपूत्राला आमंत्रित करण्यात आले आहे. रशियातील Khanty–Mansi Autonomous Okrug या प्रांताच्या राज्यपाल नतालिया कोमारोवा यांनी त्याला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. संकेत गव्हाळे असे या तरुणाचे नाव आहे. तो विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील रामपूर गावातील रहिवासी आहे.
advertisement
विदर्भाचा सुपूत्राची महिन्याभरात दुसऱ्यांदा रशियावारी -
चंद्रपूरच्या संकेत गव्हाळे हा तरुण महिन्याभरातच दुसऱ्यांदा रशियाला जाणार आहे. मागच्या महिन्यात जागतिक युवा महोत्सवासाठी त्याची निवड झाली होती. यानंतर याच महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 ते 7 मार्च 2024 दरम्यान झालेल्या या महोत्सवासाठी तो रशियाला गेला होता. तेथून परत आल्यानंतर आता पुन्हा त्याला रशियातून आमंत्रण आले आहे. यावेळी तो 22 वा आंतरराष्ट्रीय सिनेमॅटिक पदार्पण महोत्सवात पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे.
कधी होणार हा आंतरराष्ट्रीय महोत्सव -
22 वा आंतरराष्ट्रीय सिनेमॅटिक पदार्पण महोत्सव हा 23 ते 26 मार्च दरम्यान, कॉन्सर्ट आणि थिएटर सेंटर युग्रा क्लासिक, खांटी मानसिस्क (Khanty-Mansiysk) याठिकाणी होणार आहे. ब्रिक्स (BRICS) देशातील प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार आहेत.
2002 पासून होतेय आयोजन -
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 'राष्ट्रीय सिनेमॅटोग्राफीची विशेष भाषा' ही यावर्षाची थीम आहे. खांटी-मानसिस्क ऑटोनॉमस ऑक्रग - उग्रा सरकारच्या माध्यमातून 2002 पासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या चर्चेत सहयोगी देशांचा चित्रपट उद्योग विकास, चित्रपट शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर चर्चा होईल.
IIT आणि UPSC चा नाद सोडला अन् शायरीत बनवलं करिअर, आता कुशल करतोय लाखोंची कमाई
राज्यपाल नतालिया कोमारोवा यांच्यासोबत होणार बैठक -
रशियन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योग जगतातील प्रतिनिधी, मीडिया व्यवस्थापक आणि सार्वजनिक व्यक्ती, कंटेंट प्रमोशन, चित्रपट प्रदर्शनाची देवाणघेवाण, चित्रपट व्यावसायिकांसाठी एक्सचेंज कार्यक्रम सुरू करणे, राष्ट्रीय चित्रपट वितरणाच्या समस्या, तसेच वारसा आणि राष्ट्रीय ओळख जतन करणे यासह ब्रिक्स चित्रपट उद्योगांच्या विकासाच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करतील. या चर्चेमध्ये संकेत गव्हाळे हा तरुणही सहभागी होणार आहे. राज्यपाल नतालिया कोमारोवा यांच्यासोबत त्याची बैठक होणार आहे.
संकेत गव्हाळे या तरुणाची पार्श्वभूमी -
संकेत जनार्दन गव्हाळे हा तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रामपूर गावातील रहिवासी आहे. संकेत गव्हाळे या तरुणाने भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अशा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती या केंद्र सरकारच्या संस्थेतून मराठी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो दिल्लीत केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयात कार्यरत आहे.
IIMC कडून मिळाला मानाचा पुरस्कार -
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आणि डायरेक्टोरेट ऑफ फिल्म्स फेस्टिव्हलच्या माध्यमातून आयोजित, आयआयएमसी फिल्म फेस्टिव्हल 22 मध्ये त्याच्या स्कूल ऑफ नेचर या डॉक्युमेंटरीला The Critics Choice Award मिळाला होता. त्याची ही डॉक्युमेंटरी रशिया येथे राज्यपाल नतालिया कोमारोवा यांनी आवर्जून पाहिली होती. आता होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्याची ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार आहे. प्रत्येक देशाची चित्रपट इंडस्ट्री वेगळी असते. त्याची सभ्यता, संस्कृती त्याच्यातून व्यक्त होत असते आणि मला ही संधी मिळाली, त्यासाठी मी आनंदी आणि उत्सुकही आहे. मला चित्रपटांची आवड असून भविष्यात मला याच क्षेत्रात काम करायचे आहे, असे त्याने न्यूज18 लोकल सोबत बोलताना सांगितले.
प्रत्येक देशाची चित्रपट संस्कृती आणि बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. तसेच मी तिथे गेल्यावर तिथल्या संस्कृतीचे आदान-प्रदान तर होईलच पण तिथून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील. त्या गोष्टी शिकून मी भारतासाठी चांगल्या डॉक्युमेंटरी आणि चित्रपट आयुष्यात नक्कीच घेऊन येईल आणि मला त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच भारताची संस्कृती इतर देशांमध्ये चित्रपटाच्या दृष्टीने लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, असेही त्याने यावेळी बोलताना सांगितले.