जनार्धन कोळसे यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे कॉलेजमधून पूर्ण केलं. 2006 साली पदवी मिळाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले, तिथे त्यांनी कॉम्प्युटर आणि सॉफ्ट स्किल्सचे कोर्सेस पूर्ण केले आणि एका प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पण अंध असल्यामुळे त्याठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या दरम्यान त्यांनी काही काळ पेट्रोल पंपावरही काम केलं.
advertisement
मुंबई आणि पुण्यात राहत असताना जनार्धन कोळसे यांना खूप संघर्ष करावा लागला. राहण्यापासून ते दोन वेळच्या जेवणापर्यंत पण संघर्षाच्या काळातही त्यांचा आत्मविश्वास कधीच ढळला नाही. याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास सुरू केला. मात्र दृष्टिहीन उमेदवारांसाठी रायटर वेळेवर न मिळणं किंवा अपुरी तयारी असलेला रायटर मिळणं, या अडचणी वारंवार समोर येत होत्या. अनेक अडचणी असूनदेखील जनार्धन यांनी जवळपास पाच वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
अखेर 2011 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संरक्षण विभाग या दोन्ही ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू होती. जनार्धन कोळसे यांनी दोन्ही परीक्षा दिल्या आणि दोन्ही ठिकाणी त्यांची निवडही झाली. मात्र त्यांनी संरक्षण विभागातील क्लर्क पदाची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला पण ते दोन्ही डोळ्यांनी पूर्णपणे दृष्टिहीन असल्याने, डिफेन्स सेवेसाठी पात्र नाही, असं सांगत त्यांना नोकरी नाकारण्यात आली.
दरम्यान, त्यांचा प्रायव्हेट जॉबही गेला. तरीही जनार्धन यांनी हार मानली नाही. रेल्वेमध्ये छोट्या-मोठ्या वस्तू विकून त्यांनी संसाराचा गाडा चालवला आणि आपल्या डिफेन्स विभागातील नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिले. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर त्यांना डिफेन्स विभागात नोकरी मिळाली. आज जनार्धन कोळसे हे अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.





