आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, की एकूण मतप्रवाहानुसार जगातल्या सर्वांत कठीण परीक्षांमध्ये असलेलं यूपीएससी परीक्षेचं रँकिंग बदलण्याची वेळ आली आहे. आयआयटी जेईईपेक्षा ही परीक्षा जास्त कठीण असते, असा दावा त्यांनी केलाय. या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, हेही जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
आनंद महिंद्रा यांची पोस्ट
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, की 12th फेल चित्रपट पाहिल्यावर त्यांनी अनेक तरुणांशी या बाबत चर्चा केली. आयआयटी पदवी घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्टअप सुरू केलेल्या एका तरुणानं सांगितलं, की यूपीएससीची परीक्षा जेईईपेक्षा जास्त कठीण आहे. त्यानी दोन्हीही परीक्षा दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी ही गोष्ट मान्य करतात. आयआयटी आणि त्यानंतर प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेले एसपी राठोड यांच्या मते, यूपीएससी परीक्षा कठीण असण्यामागे तशी कारणंही आहेत.
advertisement
या परीक्षेच्या प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत अशा 3 फेऱ्या होतात. त्यातूनच उत्तम विद्यार्थ्यांची निवड केली जाते. दरवर्षी या परीक्षांसाठी 10 ते 12 लाख उमेदवार अर्ज करतात. त्यापैकी 5 ते 6 लाख उमेदवार प्रारंभिक परीक्षेला बसतात. त्यापैकी 15 ते 17 हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. मग उपलब्ध जागांनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं.
निकालाची टक्केवारी
जेईई परीक्षा उत्तीर्ण झालेले व सध्या आयएएस अधिकारी असलेले एसपी शुक्ला सांगतात, की यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 0.01 ते 0.2 इतकीच असते. 2022 च्या निकालांवरून याचा अंदाज बांधता येऊ शकतो. त्या परीक्षांचे निकाल 23 मे 2023 मध्ये लागले. 11.52 लाख उमेदवारांमधून केवळ 933 उमेदवारांचीच निवड झाली. हे प्रमाण अंदाजे 0.08 टक्के आहे.
अभ्यासक्रमाचा आवाका
यूपीएससी परीक्षेला अभ्यासक्रम निर्धारित असला, तरी सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न कोणतेही असू शकतात. कोणत्याही विषयावरचे प्रश्न त्यात विचारले जाऊ शकतात. ही परीक्षा कठीण असण्यामागे हेही एक कारण असू शकतं, असं शुक्ला यांचं म्हणणं आहे. ते सांगतात, की देशात एकूण 23 आयआयटी महाविद्यालयांमध्ये 17 हजारांहून जास्त जागांकरता जेईई ही परीक्षा घेतली जाते. त्यात जेईई मेन्स व जेईई अॅडव्हान्स असे दोन भाग असतात. त्यात 12 वीच्या पातळीवरील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे प्रश्न विचारले जातात. मेन्स परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 2.25 लाख विद्यार्थीच अॅडव्हान्स परीक्षेला पोहोचतात. त्यापैकी 17 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.
प्रशासकीय सेवेत काम करण्यासाठी इच्छुक असलेली इंजिनीअर स्मिता हिनं बँकिंगमधल्या एका नामांकित कंपनीत काम केलं. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्या मते, या परीक्षेचा अभ्यास करायला खूप वेळ लागतो. तसंच त्या अभ्यासाला काही सीमा नसते. प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी करून घेणारे मनुज शुक्ल यांच्या मते, दोन्ही परीक्षा कठीणच असतात. जेईईचे विषय निश्चित असल्यानं तुलनेनं थोडी सोपी म्हणता येऊ शकते, मात्र प्रशासकीय सेवा परीक्षेचा अंदाज बांधणं सोपं नसतं. त्यांच्या मते यूपीएससी हीच आजही भारतातली सर्वांत कठीण परीक्षा आहे.
कशी झाली चर्चा सुरू?
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली कठीण परीक्षांची जागतिक क्रमवारी जुनी आहे. 26 ऑक्टोबर 2023 मध्ये ती जाहीर करण्यात आली होती. तेव्हाच त्यावर चर्चा सुरू झाली होती. त्या यादीत चीनची गाओकाओ परीक्षा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर आयआयटी जेईई आणि तिसऱ्या स्थानावर यूपीएससी परीक्षा आहे. भारतातली गेट परीक्षाही या यादीत आहे.
त्या क्रमवारीमध्ये आयआयटी जेईई परीक्षा यूपीएससीपेक्षा जास्त कठीण म्हटल्यानं चर्चा सुरू झाली होती. आता आनंद महिंद्रा यांनी पुन्हा ती पोस्ट शेअर केल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे, मात्र या दोन्ही परीक्षांचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांच्या मते, यूपीएससी जेईईपेक्षा जास्त कठीण असते.
