भारतात साधारणपणे 3 मुख्य शाखा आहेत : विज्ञान (Science), वाणिज्य (Commerce) आणि कला (Arts). काही शाळांमध्ये गृहविज्ञान (Home Science) किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचा (Vocational Studies) पर्याय देखील असतो. अकरावीत योग्य शाखा निवडणे हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. यावरच तुमच्या भविष्यातील करिअरची दिशा ठरणार असते (How to Choose Best Stream). तुम्ही अकरावीत कोणते विषय शिकणार आहात हे तुमच्या आवडीवर, कौशल्यावर आणि भविष्यातील ध्येयांवर अवलंबून असते. काही टिप्स जाणून घ्या, ज्याच्या मदतीने तुम्ही अकरावीत योग्य शाखा निवडू शकता.
advertisement
तुमची आवड कशात आहे?
सर्वात आधी हे समजून घ्या की तुम्हाला कोणते विषय वाचायला आवडतात. जर तुम्हाला गणित, भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्र आवडत असेल, तर विज्ञान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. जर तुम्हाला अर्थशास्त्र, व्यवसाय किंवा अकाउंटिंग आवडत असेल, तर वाणिज्य एक चांगला पर्याय असू शकतो. दुसरीकडे, जर तुम्हाला इतिहास, साहित्य, भाषा किंवा समाजशास्त्र आवडत असेल, तर तुम्ही कला शाखा निवडू शकता. तुम्हाला कोणते विषय आवडतात हे तुमच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही.
तुमची कौशल्ये कोणती आहेत?
तुमचं गणित आणि आकडेमोड चांगली आहे का? की तुमची कलात्मकता आणि लेखन कौशल्ये चांगली आहेत? तुमच्या जमेच्या बाजू आणि कमजोर बाजू समजून घ्या. उदाहरणार्थ, विज्ञानासाठी गणित आणि तार्किक विचारसरणीची गरज असते, तर कला शाखेसाठी सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक लेखनाची गरज असते. इयत्ता 10 पर्यंत तुम्ही ज्या विषयात किंवा कौशल्यात प्रावीण्य मिळवले आहे, त्यावर आधारित तुम्ही इयत्ता 11 वी साठी योग्य शाखा निवडू शकता. यासाठी दहावीचा निकाल येण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या.
भविष्यात काय करायचे आहे?
तुमचे भविष्यातील ध्येय काय आहे? जर तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर किंवा वैज्ञानिक व्हायचे असेल, तर 12 वी नंतर तुम्हाला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन MBBS, BTech सारखे अभ्यासक्रम करावे लागतील. जर तुम्हाला व्यवसाय, बँकिंग किंवा चार्टर्ड अकाउंटंटमध्ये रस असेल, तर वाणिज्य योग्य राहील. जर तुम्हाला नागरी सेवा, शिक्षण, डिझायनिंग किंवा पत्रकारिता यांसारख्या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कला एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही करिअर मार्गदर्शकांकडूनही सल्ला घेऊ शकता.
अकरावीत योग्य शाखा कशी निवडायची?
1) शिक्षक आणि कुटुंबाचा सल्ला घ्या : तुमच्या शिक्षकांशी बोला, ते तुमची क्षमता खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. तुमच्या आई-वडिलांशी किंवा मोठ्या भावंडांशीही चर्चा करा, पण अंतिम निर्णय तुमचाच असावा.
2) दबावाखाली येऊ नका : अनेकवेळा मित्र किंवा समाजाच्या दबावाखाली शाखा निवडली जाते. असे करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला विज्ञान शिकायचे नाही, तर जबरदस्तीने त्यात प्रवेश घेऊ नका.
3) प्रत्येक शाखेचे फायदे समजून घ्या...
- विज्ञान : वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन यांसारख्या क्षेत्रांसाठी.
- वाणिज्य : व्यवसाय, वित्त, विपणन (मार्केटिंग) सारख्या करिअर पर्यायांसाठी.
- कला : लवचिकता देते, कायदा, साहित्य आणि माध्यम यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संधी आहेत.
उदाहरण : जर तुम्हाला गणित आवडत असेल आणि इंजिनियर व्हायचे असेल, तर विज्ञान (PCM – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) निवडा. जर तुम्हाला स्टार्टअपमध्ये रस असेल, तर वाणिज्यमध्ये अकाउंटन्सी आणि बिझनेस स्टडीज घ्या.
हे ही वाचा : बस कंडक्टरची मुलगी पहिल्यांदा डाॅक्टर, नंतर IAS अधिकारी झाली, आजही लाखो विद्यार्थ्याची आहे प्रेरणा!
हे ही वाचा : Learn English : मुलाखतीसाठी निघालाय अन् इंग्रजी येत नाहीये? 'ही' 20 वाक्यं लक्षात ठेवा अन् नोकरी मिळवा!